समृद्धी महामार्गाच्या कामामुळे सेलू व वर्धा तालुक्यातील शेतक-यांचे नुकसान झाल्यास महामार्गाचे बांधकाम बंद पाडण्यात येईल,असा इशारा आमदार डॉ.पंकज भोयर यांनी दिला आहे. यासंदर्भात आमदार भोयर यांनी आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याशी शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा केली.

समृद्धी महामार्गाचे सेलू व वर्धा तालुक्यात काम सुरू आहे. महामार्गासाठी मोठया प्रमाणात शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु महामार्गाच्या कामामुळे शेतक-यांना मनस्ताप होताना दिसत आहे. सेलू व वर्धा तालुक्यातील केळी, पांढरकवडा, वानोडा, महाकाळ व पिपरी येथील शेतक-यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत शेतक-यांनी आपल्या व्यथा आमदार भोयर यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यानंतर आज आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार  यांची शेतक-यांसह भेट घेतली.

यावेळी आमदार भोयर यांनी, महामार्ग उंच असल्याने शेतजमीन खाली आली आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून कंपनी ने नुकसान भरपाई द्यावी, समृद्धीच्या वाहनामुळे रस्ते खराब झाल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, शेताच्या वहिवाटीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्त्यांची व्यवस्था, चुकीमुळे वाहून गेलेल्या पुलांची निर्मीती व दुरूस्ती, शेतात जाण्यासाठी रस्ते बंद झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत असून, शेतातील पीकं काढणे देखील कठीण झाल्याने नुकसान भरपाई, महामार्गाच्या सीमा भिंतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याने त्याचे निराकरण करण्यात यावे आदी मागण्यांबाबत चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारी व अभियंत्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार डॉ.पंकज भोयर यांना सांगितले.
कंपनी व प्रशासनाने शेतक-यांच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास कंपनीविरूद्ध अॅक्शन घेऊन काम बंद पाडण्यात येईल, असे यावेळी सांगितले.याप्रसंगी सेलू तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक कलोडे, शेतकरी वैभव वानखेडे, वैभव दाते, नारायण खोबे,राजू बिजवार, माधुरी राऊत, रामकृष्ण मिटकर, प्रभाकर लोणकर, राजू डोंगरे, भाऊराव सुरनकर, सुयोग ठाकरे, मोनू ठाकुर, अतुल बावणकर, अक्षय पवार, राजू थोटे, विवेक धोटे आदी उपस्थित होते.