19 January 2021

News Flash

जलकुंभातून दूषित पाणी

दोन वर्षांपासून स्वच्छता नाही; सफाईसाठी दिले जाणारे अनुदान बंद

दोन वर्षांपासून स्वच्छता नाही; सफाईसाठी दिले जाणारे अनुदान बंद

विरार : वसई-विरार महापालिकेने शहरातील जलकुंभांची गत दोन वर्षांपासून साफसफाई न केल्याने दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात असलेल्या विहिरी, कुपनलिका, सार्वजनिक पाणवठे साफसफाईसाठी दिले जाणारे अनुदान पालिकेने बंद केले असल्याने ग्रामीण भागातही अस्वच्छ आणि दूषित पाणीपुरवठा होऊ  लागला आहे. करोनाचे कारण देत पालिकेने बचावात्मक पवित्रा घेतला आहेत.

वसई-विरार महापालिकेला सूर्या पाणी प्रकल्पाबरोबर पेल्हार आणि उसगाव या धरणांमधून पाणीपुरवठा होत असतो. हे पाणी जलवाहिन्यांमार्फत शहरात आणले जाते. जलकुंभांत हे पाणी आणल्यानंतर त्याचे शहरात वितरण केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार वसई-विरार परिसरात लहान-मोठे  ७० हून अधिक पाणी साठवण करणारे जलकुंभ आहेत. मोठय़ा संख्येने विहिरी असून ५००हून अधिक बोरवेल आहेत. किमान वर्षांतून दोनदा एक पावसाळ्याअगोदर आणि पावसाळ्यानंतर  या जलकुंभांची साफसफाई होणे गरजेचे असते. परंतु वसई-विरार महापालिकेने मागील दोन वर्षांपासून या जलकुंभांची स्वच्छता केली नसल्याचा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा महापालिकेला पत्रव्यवहार केले असून जलकुंभांची स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात अस्वच्छ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर करोना काळात कर्मचारी नसल्याने हे काम झाले नसल्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. यामुळे जीवनावश्यक गरजांच्या बाबतीतसुद्धा उदासीन असल्याचे समोर आले आहे.  विशेष बाब म्हणजे पालिकेने केवळ मोठे जलकुंभ  मागील वर्षी साफ केले होते तर लहान सार्वजनिक टाक्या मागील दोन वर्षांपासून साफ झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. नुकताच मांडवी गावात दूषित पाणी प्यायल्याने गावाला अतिसाराची लागण झाल्याची घटना ताजी आहे. पालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पावसाळ्यात पाण्याबरोबर येणारा गाळ, माती ही टाकीत साचून राहते. यामुळे पाणी दूषित होते. यामुळे दूषित पाणीपुरवठा करून महापालिका नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहे. महापालिकेने पाण्याच्या टाकीची देखभाल या शीर्षकाखाली १०० लाखांची तर सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे व दुरुस्तीसाठी  ५० लाख रुपयांची तरतूद २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून हा निधी वापरण्यात आला नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलस्रोतातून गाळयुक्त अस्वच्छ पाणी येते. यामुळे टाक्यांची नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे. पण महापालिकेने नागरिकांच्या जिवाशी खेळ चालवला आहे. शहराला मागील दोन वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा पालिका करत आहे.

– किरण चेंदवणकर , माजी नगरसेविका, वसई-विरार महापालिका

सध्या करोनाकाळात महापालिका अनेक कामांत व्यस्त असल्याने कर्मचारी तुटवडा निर्माण झाला असल्याने या वर्षी जलकुंभ साफसफाई झाली नाही. पण लवकरच हे काम पूर्ण केले जाईल.

– रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 1:44 am

Web Title: contaminated water supply from vvmc water tank to residents zws 70
Next Stories
1 मच्छीमार मदतीपासून वंचित
2 उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ
3 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती
Just Now!
X