करोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने भविष्यात येणारी आव्हानं लक्षात घेता वानखेडे स्टेडिअम क्वारंटाइनसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “करोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वारंटाइन सुविधेसाठी वानखेडे मैदान ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतलं जाऊ नये ? तिथेही योग्य सुविधा उपलब्ध आहेत”. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांना टॅग केलं होतं.

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत ट्विटरवरुन उत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत”.

आदित्य ठाकरे यांच्या उत्तरामुळे वानखेडे मैदाना क्वारंटाइनसाठी वापरलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही क्वारंटाइनसाठी कोणतंच मैदानात ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडिअममध्ये व्यवस्था करता येईल का याची पाहणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून करण्यात आली होती. वानखेडे परिसरातील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता.