गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. काही भागांमध्ये करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं देखील दिसून येत असताना राज्य सरकारने मात्र सावध भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या करोना आकडेवारीमधून राज्यासाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनाव मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. आज दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे करोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

आज बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत करोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. पण दुसरीकडे राज्यातील नव्या बाधितांची देखील आज भर पडली असून आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार ०१८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर स्थिर, मात्र घट होईना!

दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट आणि नव्या करोनाबाधितांची संख्या या बाबतीत काहीशी दिलासादायक परिस्थिती असली, तरी करोनामुळे होणारे मृत्यू ही अजूनही राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १६७ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आजअखेर २.०४ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हाच मृत्यूदर कायम असून तो कमी न होणं हे मोठं आव्हान ठरलं आहे. राज्यात आजपर्यंत करोनामुळे १ लाख २६ हजार ७२७ मृत्यू झाले आहेत.

 

मुंबईत ४४६ नवे रुग्ण, तर ११ रुग्णांचा मृत्यू

एकीकडे राज्यात हे चित्र असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज दिवसभरात ४४६ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ७ लाख ३० हजार २४१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५ हजार २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज मुंबईत घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ४७० इतकी नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी मुंबईत गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोना मृतांचा आकडा आता १५ हजार ६७८ इतका झाला आहे.