सांगली जिल्ह्य़ातील करोना मृत्यूचे प्रमाण ४.१ टक्के असून हे देशात सर्वाधिक आहे. अशा स्थितीत शासन आणि मंत्री गंभीर दिसत नसल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मिरजेतील कोविड रुग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी जिल्ह्य़ातील करोना स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सांगलीतील करोना मृत्युदर हा अन्य जिल्ह्य़ापेक्षाच नव्हे तर देशात सर्वाधिक आहे. संसर्गाचे प्रमाण १६ टक्के आहे. करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयामध्ये अतिरिक्त व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत, चाचण्यांचा वेग वाढवावा लागणार आहेत. संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल येण्यास ७२ तासांचा अवधी लागत असून या काळात संसर्ग वाढण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी तातडीने काही उपाय योजने गरजेचे आहे. यासाठी केवळ प्रशासनावर जबाबदारी टाकून लोकप्रतिनिधींना दूर राहता येणार नाही.

जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यासाठी मर्यादा येत असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यायला हवा. खाटांची संख्या वाढवत असताना  पूरक साधनेही उपलब्ध करून द्यायला हवीत यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक संस्थांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी फडणवीस यांनी इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात जाऊन रुग्णांशीं दूरचित्रसंवादद्बारे संवाद साधला. रुग्णालयात मिळत असलेल्या उपचाराबाबत माहितीही घेतली. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मिरजेतील सिनर्जी रुग्णालयात उपचार घेत असलेले आ. सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याशीही दूरचित्रसंवादद्बारे संपर्क साधून प्रकृतीची चौकशी करीत शुभेच्छा दिल्या. महापालिकेने कोल्हापूर रोडवर आदिसागर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या करोना काळजी केंद्रालाही भेट दिली.