सुहास बिऱ्हाडे

१३४ पैकी ६५ रुग्ण मुंबईत सेवा देणारे; कामाच्या ठिकाणीच निवासाची सोय करण्याची मागणी

वसई-विरार शहरातील करोनाची लागण होण्याचा वेग मंदावला असून त्यातही जे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी मुंबईला ये-जा करतात त्यांनाच लागण होत असल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी लागण झालेल्या दोन्ही महिला देखील परिचारिका असून त्या मुंबईतील रुग्णालयात ये-जा करत होत्या. अशा कर्मचाऱ्यांची मुंबईलाच निवासाची सोय करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

वसई-विरार शहरात गुरुवार संध्याकाळपर्यंत १३४ करोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या वाढीचा वेग बऱ्यापैकी मंदावल्याचे दिसून येत आहे. परंतु सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत ते दररोज मुंबईला ये-जा करणारे अत्यावश्यक सेवेतील त्यातही वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आहेत. त्यात परिचारिका, वॉर्ड बॉय, दवाखान्यातील तंत्रज्ञ, दवाखान्यातील फार्मासिस्ट, रुग्णालयातील इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

त्यापाठोपाठ पंचतारांकित रुग्णालयाचे कर्मचारी आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत. वसईतून मोठय़ा संख्येने अशा ठिकाणी कर्मचारी ये—जा करत आहेत. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) १२९ बसफेऱ्या सुरू आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार वसईतून दरोरज मुंबईला जाणाऱ्या सुमारे ४७ हून अधिक वैद्यकीय आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यामुळे इतर २० जणांना लागण झाली आहे. म्हणजेच वसईतील १३४ पैकी ६५ रुग्ण हे केवळ मुंबईत ये-जा करणाऱ्यांमुळे झाले आहेत.

हे कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यांच्याबद्दल नितातं आदर आहे. मात्र त्यांच्या रुग्णालयाने आणि मुंबई महापालिकेने या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे वसईतील करोनाग्रस्तांची संख्या आपोआप कमी होऊ  शकणार आहे.

करोनाग्रस्त रुग्णांचा वेग मंदावला

१९ मार्च रोजी शहरात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पाचव्या आठवडय़ात ५१ रुग्ण होते. नंतर मात्र रुग्ण संख्या कमी होऊ  लागले आहेत. सहाव्या आठवडय़ात ( २० एप्रिल ते २६ एप्रिल) ३२ आणि सातव्या आठवडय़ात ( २७ एप्रिल ते ३० मे) केवळ १४ रुग्णांची नोंद झाली आहे.