जिल्ह्यात दुकाने उघडी ठेवण्याची वेळ घटवून अर्धवेळ टाळेबंदी व संचारबंदी असल्यानंतरीही करोना रुग्णांच्या संख्येत आणि रुग्णांच्या मृत्यू संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज शनिवारी पुसद येथील एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात उच्चांकी ३० करोनाबाधितांची भर पडली. जिल्ह्यात मृतांची संख्या १७ झाली असून एकूण रुग्णसंख्या ५४८ इतकी झाली आहे.

आणखी वाचा- रायगडमधील टाळेबंदी शिथील; अत्‍यावश्‍यक वस्‍तूंची दु‍कानं मर्यादीत वेळेसाठी राहणार सुरू

आज मृत्यू झालेला ५३ वर्षीय व्यक्ती पुसद शहरातील दुधे ले-आऊट येथील रहिवासी होता. तसेच नव्याने सकारात्मक आलेल्या ३० जणांमध्ये १६ पुरुष आणि १४ महिला आहेत. यात नेर शहरातील चिरडे ले-आऊट येथील तीन पुरुष व तीन महिला, नेर शहरातील जलाराम नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक महिला तसेच आणखी यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील चार पुरुष व पाच महिला, कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील एक पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व चार महिला यांचा समावेश आहे.

आणखी वाचा- गडचिरोलीत एसआरपीएफच्या ७२ जवानांना करोनाची लागण

आज ३० जण नव्याने सकारात्मक आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १७४ वर पोहचली होती. मात्र १७ जणांना उपचारानंतर आज सुट्टी झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १५७ वर आली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १०० तर ‘रॅपीड ॲन्टीजन’ चाचणीद्वारे ५७ जण सकारात्मक आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या ५४८ झाली आहे. यापैकी ३७४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत विलगिकरण कक्षात १२७ संशयित भरती आहेत.