करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीजास्त लसीकरण तसेच घरोघरी लसीकरणाची भूमिका राज्य कृतीदलाने घेतली आहे. तसेच लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे अग्रक्रमाने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लसीकरणाबाबत केंद्राने सुरुवातीपासूनच गोंधळ घातला आहे. १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय केंद्राने जाहीर केल्यापासून लसीकरणाचा मोठाच गोंधळ देशभरात सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरेसा पुरवठा करत नसतानाच १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यामुळे राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४५ वयापुढील लोकांचे लसीकरण अद्यापि पूर्णपणे झालेले नाही. लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना एकाच वेळी लस देण्याचे धोरण स्वीकारल्यास महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील लोकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्यांने लस दिली जावी, अशी भूमिका राज्य कृती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव विकास खारगे, कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते. लसीकरणाचा वेग वाढवताना शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

नक्की वाचा >> जाणून घ्या : Paytm वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं

केंद्र सरकारकडून लसींचा होणारा पुरवठा तसेच एकूण उपलब्ध होणार्या लसींची संख्या लक्षात घेता ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जावे, अशी भूमिका बैठकीतील सदस्यांनी मांडली. अजूनही ४५ पुढील लोकांचा लसीचा दुसरा डोस शिल्लक आहे. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे आधी लसीकरण करावे अशी भूमिका डॉ शशांक जोशी यांनी मांडली. याबाबत डॉ शशांक जोशी यांना विचारले असता, तिसर्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे, पॉझिटिव्ह दर कमी करणे तसेच गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे तसेच जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे व लोकांनी करोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन केले तर दैनंदिन व्यवहार पूर्णपणे खुले करणे योग्य ठरेल, असेही डॉ जोशी म्हणाले. तिसर्या लाटेत युवा पिढी म्हणजे २० ते ४० वयोगटातील लोकांना फटका बसू शकतो. साधारणपणे ३.५ टक्के लहान मुलांना करोनाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेता सुयोग्य पद्धतीने लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठीच लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य दिले पाहिजे, असेही डॉ जोशी यांनी सांगितले.

नक्की वाचा >> Corona Vaccination : ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य; अजित पवारांनी दिली माहिती

केंद्र सरकारचे सुरुवातीपासून लसीकरणाबाबात गोंधळ व धरसोड वृत्ती राहिली आहे. आपल्याकडे पुरेशा लसींचे उत्पादन होत नसतानाही आपण लसींची निर्यात केली. लसींचे वाटप तसेच दरावरूनही केंद्राने गोंधळ घातला आहे. यातूनच आज भारत बायोटेक ने १५० रुपयात लसींचा पुरवठा करता येणार नाही, असे पत्रच केंद्राला दिले आहे. याबाबत डॉ संजय ओक यांना विचारले असता जास्तीतजास्त लसीकरण झाले पाहिजे तसेच घरोघरी जाऊन लसीकरण होणे गरजेचे असून त्याबाबत कृती दलाने यापूर्वीच सादरीकरण केले आहे. रेंगाळलेलेले लसीकरण तसेच लोकांकडून करोनाच्या नियमांचे योग्य पालन होत नसल्यामुळे माझ्या मते तिसरी लाट नोव्हेंबर- डिसेंबरला नाही तर कदाचित ऑगस्ट- सप्टेंबरमध्येच येईल असे डॉ संजय ओक म्हणाले. लहान मुलांच्या शाळा सरकारने सुरु करू नयेत तसेच उत्पन्न मिळविणार्या पालकांचे जास्तीतजास्त लसीकरण करावे असेही डॉ ओक यांनी सांगितले.

नक्की वाचा >> समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?

नक्की पाहा >> लस At First Sight… ‘या’ फोटोवरुन नेटकऱ्यांमध्येच जुंपली; जाणून घ्या नक्की घडलंय काय?

राज्यात १५ जूनपर्यंत दोन कोटी ६४ लाख ३९ हजार ८२९ जणांचे लसीकरण झाले आहे. ४५ पुढील लोकांचे लसीकरण अजूनही मोठ्या संख्येने होणे बाकी आहे.या वर्गातील लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेल्याची टक्केवारी ३९ टक्के एवढी आहे. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून त्यांना १२ कोटी डोसेस लागणार आहेत. राज्य सरकारने लसीकरण करण्याची व्यवस्था केली असली तरी लस उपलब्धता व योग्य नियोजन हा मोठा विषय राहाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.