प्रशांत देशमुख

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या सर्वेक्षणातील करोनाच्या मृत्यूदराची भीती अनाठायी आहे. इतर आजारांसारखाच हा एक आजार आहे, असे समजून उपाय करायला हवेत. हा आजार टाळण्यासाठी टाळेबंदीसारखे पर्याय लोकांच्या जीवनाशी खेळ ठरेल, असे मत करोना संसर्ग अभ्यासक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. खांडेकर यांनी या संदर्भात रोग नियंत्रण केंद्र व दिल्ली शासनाने केलेल्या अ‍ॅन्टीबॉडी सिरो सर्वेक्षणाचा दाखला दिला आहे.

या सर्वेक्षणात दिल्लीच्या ३३ टक्के जनतेत करोनाची प्रतिकारशक्ती दिसून आली. म्हणजेच ६५ लाख लोक करोनाने बाधित झाले असावे व यातील बहुतांश रुग्णालयात दाखल न होता बरेही झाले असावे. येथील मृत्यूदर फक्त ०.०५ टक्के निघतो. म्हणजेच पूर्वीच्या ३.४ टक्के अनुमानापेक्षा हा फारच कमी आहे. जसजसे या प्रकारचे सर्वेक्षण होतील तसतसा हा मृत्यूदर कमी झालेला दिसेल. २००९मध्ये स्वाईन फ्ल्यू साथीवेळीसुद्धा ३.४ टक्के मृत्यूदर सांगण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील २४ टक्केम्हणजेच जवळपास ३० कोटी लोकांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. परंतु प्रत्यक्ष मृत्यूदर ०.०२ टक्केच होता, असे डॉ. खांडेकर यांनी निदर्शनास आणले आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीत इतक्या मोठय़ा प्रमाणात लोकांना करोनाची लागण होऊनही रुग्णालयात जाण्याची गरज पडलेली नाही. म्हणजेच मृत्यूदराबाबत जी भीती निर्माण झाली ती अवास्तव होती. म्हणून शासनाने या आजारावर आपत्तीचा शिक्का मारू नये. एखाद्या भागात करोना रुग्ण आढळल्यास लगेच मोठा परिसर प्रतिबंधित केला जातो. याबाबत फेरविचार करावा. शासनाने सध्या उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचा तसेच महाराष्ट्रातसुद्धा सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावे. लोकांची भीती कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा डॉ. खांडेकर यांनी व्यक्त केली आहे.