करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली असताना आज, शहरात 28 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 349 वर पोहचली आहे.

अगोदरच औरंगाबाद शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. त्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.

आज आढळलेले रुग्ण हे  जय भीमनगर, बायजीपुरा, संजयनगर, किराडपुरा, दत्तनगर, कैलासनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर, कबीर कॉलनी, उस्मानपुरा, पुंडलीकनगर, बेगमपुरा, हक टॉवर व रेल्वेस्टेशन परिसरातील आहेत.

औरंगाबादमध्ये करोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांच्या आकडेवारीतही दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. मंगळवारी ६५ वर्षीय महिलेचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे.