राज्यात सध्या करोनाने थैमान घातलं असून दिवसोंदिवस करोनाग्रस्तांच्या आकड्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा रविवारी २२ हजारांवर पोहचला. रविवारी (१० मे २०२०) दिवसभरात राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्या १ हजार २७८ ने वाढल्याचे पहायला मिळालं. करोनामुळे रविवारी राज्यात  ५३ जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईमध्येही रविवारी एका दिवसात ८७५ रुग्ण अढळून आल्याने सरकारी यंत्रणांची झोप उडाली आहे. मुंबईमधील करोनाग्रस्तांचा आकडा १३ हजार ५६४ वर पोहचला आहे. राज्याबरोबर मुंबईमधील करोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने सरकारला ट्विटवरुन शाब्दिक टोला लगावला आहे.

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन एका फॉर्वडेड मेसेजच्या माध्यामातून राज्याच्या परिस्थितीवर टीकास्त्र सोडले आहे. “महाराष्ट्रात लॉकडाऊन लुंगीसारखं झालयं. फक्त वरुन गाठ मारलीय. बाकी सर्व मोकळच आहे,” असे ट्विट खोपकर यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर हा मेसेज व्हायरल होत आहे. याच मेसेजच्या माध्यमातून खोपकर यांनी राज्यामध्ये लॉकडाउनचे योग्यपद्धतीने पालन होत नसल्याकडे इशारा केला आहे. लॉकडाउनचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्यानेच करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरुन लुंगीचे उदाहरण देत महाराष्ट्रातील परिस्थितीचे वर्णन करणारा हा मेसेज काही दिवसांपासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर करोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मेअखेपर्यंत काळजी घेऊन आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्यांनी राज्यात लॉकडाउन आणखी लांबण्याचे संकेत दिले आहेत. “लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात करोनाची साथ नियंत्रणात राहिली. आता मेअखेपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वानी सहकार्य केल्यास यात यश येईल. महिना सरेपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल. त्यामुळे नारिंगी आणि हिरव्या क्षेत्रातील धोका वाढणार नाही,” असं उद्धव यांनी सर्व पक्षीय नेत्यांना या बैठकीमध्ये सांगितलं होतं.