वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन हा उपाय नाही हे मान्य करताना त्यासाठी पर्याय हवा असं सांगितलं. तसंच विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करणार असून पर्यायी मार्ग न सापडल्यास लॉकडाउन करावा लागेल असा इशारा दिला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सल्ला दिला आहे.

दोन दिवसांची मुदत

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी इतर देशांनी जाहीर केलेल्या पॅकेजची आठवण करुन दिली आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची असा टोलाही लगावला आहे.

फडणवीसांनी काय म्हटलं आहे –
फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…

पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…

आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…

“तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल,” असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.

“होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

कृपया राजकारण करू नका..
“करोनाची परिस्थिती सर्वत्र आहे. जगात अमेरिका, ब्रिटन, ब्राझिल आदी देशांत टाळेबंदी वा तत्सम उपाय केले जात आहेत. त्यामुळे आता कृपा करून यात राजकारण आणू नका,” असे आवाहन ठाकरे यांनी विरोधकांना केले. “रस्त्यावर उतरायचे तर लोकांना मदत करण्यास उतरा. चाचण्या करणाऱ्यांना मदत करा. हातात हात घालून ही लढाई लढावी लागणार आहे,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सोमवारपासून कठोर निर्बंध?
लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी येत्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले जातील. सरसकट लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे संक त सरकारीमधील उच्चपदस्थांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सायंकाळी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. काँग्रेसने सरसकट लॉकडाउनला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचाही विरोध आहे. यामुळे सरसकट लॉकडाउन लागू केला जाणार नाही. त्याऐवजी दृश्य स्वरूपात दिसतील, असे कठोर निर्बंध लागू केले जाणार आहेत. हे निर्बंध कोणते असतील यावर बैठकीत खल झाला. शनिवारीही बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वे बहुधा रविवारी जाहीर केली जातील.