वाई : पुण्यापाठोपाठ साताऱ्यात करोनानं चंचुप्रवेश केला आहे. दुबई आणि कॅलिफोर्नियावरून साताऱ्यात आलेल्या दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. साताऱ्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे रात्री उशिरा संशयित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर कॅलिफोर्नियाहून आलेल्या पुरुष प्रवाशालाही विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या दोघांचा अहवाल पुण्यातील एन.आय.व्ही. संस्थेकडून सोमवारी रात्री जिल्हा आरोग्य विभागाला मिळाला. यात महिला व पुरुष कोविड- १९ बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी या वृत्ताला दुजारे दिला आहे. ‘या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास १५ वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून, प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर आहे. कॅलिफोर्नियाहून आलेल्या पुरुषाला त्रास होऊ लागल्यावर त्यांनी सातारा प्रशासनाशी संपर्क साधला होता. त्यांची तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या दोघांचा अहवाल एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून काल रात्री प्राप्त झाला असून ही महिला व पुरुष कोविड- १९ बाधित आहेत,’ असं जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

‘या दोन घटनांमुळे कोणीही घाबरून जावू नये. जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. विनाकारण कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी शेखरसिंह म्हणाले.