राज्यातील करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच महानगरांमध्ये लॉकडाउनची स्थिती आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आलेख मात्र चढताच असल्याचं दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी सात हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले होते. तर आज तब्बल आठ हजारांच्या जवळ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात सध्या १ लाख ११ हजार ८०१ इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येचं प्रमाण जुलैपासून सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात दिवसभरातील उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर हा आकडा काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं होतं. त्यात बुधवारी पुन्हा वाढ झालेली दिसली.