जळगाव येथे रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८२ वर्षीय करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सहा दिवसांनी बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला. या घटनेमुळे करोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या आरोग्य विभागावर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांना या घटनेवरुन हळहळ व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं. जळगाव येथील रुग्णालयात करोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वृद्ध महिलेला दाखल करण्यात आलं होतं. ती वृद्ध महिला आठ दिवसांपासून रुग्णालयातून हरवली होती. आठ दिवसांनी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रुग्णालयाशेजारीच सापडला. काही दिवसांपूर्वी याच मुलाची आई करोनामुळेच दगावली. परमेश्वराने इतकं निष्ठुर कधी होऊ नये. अशी वेळ कधीच कोणत्या शत्रूवरदेखील येऊ नये”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार केला तर या गोष्टीबद्दल प्रचंड दु:ख आणि संताप वाटतो. राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार? आवाज उठवायलाच हवा. मी त्या मुलाच्या दु:खात सहभागी आहे”.

काय आहे घटना ?
भुसावळ येथील वृद्ध महिला कोविड रुग्णालयातून पाच जूनपासून बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह बुधवारी सकाळी रुग्णालयातील सात नंबर वॉर्डातील शौचालयात आढळून आला. सहा दिवस हा मृतदेह शौचालयात पडून होता. भुसावळची ही महिला एक जून रोजी त्रास होत असल्यामुळे कोविड रुग्णालयात दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी ती बेपत्ता झाली होती. तीन जून रोजी पुन्हा रुग्णालयातच आढळून आली. यानंतर पाच जूनपासून पुन्हा बेपत्ता झाली. रुग्णालयातील डॉक्टरांनी वृद्धेच्या नातेवाईकांना तशी माहिती दिली. त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

बुधवारी सकाळी रूग्णालयातील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागली. शौचालयाची कडी आतून बंद होती. सफाई कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेली भुसावळची वृद्धा शौचालयात मयत अवस्थेत आढळून आली. यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन नातेवाईकांकडून ओळख पटवली.

‘करोनामुळे आधी आईचे निधन झाले. नंतर वडिलांना वेळीच नाशिक हलविले म्हणून त्यांच्यावर उपचार होत आहे. नंतर आजी बेपत्ता झाली. बुधवारी आजीचा मृतदेह मिळाला. त्यामुळे आधी आई आणि आता आजीही गमावली’, असे म्हणत आजीच्या नातवाने अश्रुंना वाट मोकळी करून दिली.