करोनाची तीव्र लक्षणे आढळून आल्यास किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री म्हणजे करोना व्हायरसची लागण झालेल्या देशातून प्रवास केला असेल, तरच करोनाची चाचणी केली जाईल अशी अत्यंत महत्वाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या करोना व्हायरसमुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. करोना व्हायरसबद्दल अनेकांकडे अल्प माहिती असल्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास करोनाची चाचणी करण्यासाठी अनेकजण रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.

तुम्ही सर्दी, खोकला झाला म्हणून करोनाची चाचणी होणार नाही. या चाचणीचे काही प्रोटोकॉल आहेत. खर्च आहे. त्या प्रोटोकॉलनुसारच चाचणी होईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आठ नवीन लॅब सुरु होणार
करोना व्हायरसचा होणारा फैलाव लक्षात घेता, महाराष्ट्रात लॅबची संख्या प्रचंड कमी आहे. करोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात करोना व्हायरसच्या चाचण्या करणाऱ्या आठ नवीन लॅब होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी आज पुण्यातील एनआयव्ही या संस्थेला भेट दिली.

“उद्यापासून तीन ठिकाणी करोनाच्या चाचण्या करणाऱ्या लॅब सुरु होणार आहेत. नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरणे दिली जातील. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.