करोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी कोणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी असंही म्हटलं आहे. देशावरचा करोनाचा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे. करोनोच्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी कोणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी असंही म्हटलं आहे. देशावरचा करोनाचा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्रांचं आयोजन करुन सामुहिक पद्धतीनं करण्याची आपली परंपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं. परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. नागरिकांनी यंदा करोनाविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची, त्याला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

आणखी वाचा- आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; अजित पवारांचा संताप

याआधी अजित पवार यांनी करोनाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती दिली. भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. करोनाच्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केलं.

अजित पवारांच्या आवाहनातील मुद्दे –

– राज्यप्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी,

– पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य

– नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावं. खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.

– भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.

– जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.

– कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार

– भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार, त्यांचं नुकसान होणार नाही,

– राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस चांगलं काम करत आहेत.

– आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.

– मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.