उस्मनाबाद जिल्ह्यात विदेशातून परतलेल्या स्थानिक नागरिकांची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकाडील चुकीच्या नोंदी असलेली माहिती व्हायरल झाल्यामुळे अनेकांना गावपातळीवर अवमानकारक वागणुकीचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही प्रकारचे संक्रमण नसताना केवळ चुकीची माहिती वेगाने प्रसारित झाल्यामुळे मनस्ताप होत आहे. त्यामुळे चुकीची माहिती दुरुस्त करून या मानसिक दडपणातून मुक्त करावे अशी विनंती यातील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर 1 मार्च पासून विदेशातून परतलेल्या नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. आजवर 79 जण परदेशातून 1 मार्च नंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यात दाखल झाले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या यादीत 1 मार्चपूर्वी आपल्या मायदेशी परत आलेल्या काही नागरिकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आणि त्यांच्या नावासमोरील राखण्यात चक्क चुकीची तारीख नोंद करण्यात आली आहे. काही नागरिकांच्या नावसमोर ते ज्या देशातून परत आले त्याऐवजी दुसऱ्याच देशाचे नाव लिहिले आहे. जिल्हा प्रशासनाच्या गांभीर्याचा कळस म्हणजे परदेशातून परत आलेल्या एका नागरिकाच्या नावसमोरील देशाच्या राखण्यात चक्क पुणे असे नाव नोंद केले आहे. तर लदाख हा देखील स्वतंत्र देश असल्याचे यात नोंदविण्यात आले आहे. ही सगळी माहिती देशाच्या हवाई वाहतूक विभागाकडून प्राप्त झाली असल्याचे सांगून तहसीलदार गणेश माळी यांनी चक्क हात वर केले. चुकीची तारीख, चुकीचे देश आणि चुकीची माहिती असलेली 69 जणांच्या नावासह असलेली यादी सध्या समाजमाध्यमातून सगळीकडे व्हायरल झाली आहे. त्यामुळे विदेशातून आपल्या मायभूमीत परतलेल्या अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.

उस्मानाबाद शहरातील सहाजण दुबई येथे गेले होते. 18 फेब्रुवारीला दुबईवारीला गेले हे सहाजण 26 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद शहरात परतले. मात्र या यादीत त्यांचा प्रवास फेब्रुवारी नव्हे तर मार्च महिन्यात झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 19 मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी तपासणी करून घेतली. आणि त्यानंतर त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. 19 मार्च रोजी सकाळी तपासणी करून घरी परतलेल्या सहा जणांपैकी पाच जण त्याच दिवशी म्हणजे 19 मार्च रोजीच विदेशातून जिल्ह्यात परतले असल्याचे शासन दप्तरी नोंद करण्यात आले आहे. तर एकाच्या नावसमोरील 26 फेब्रुवारी अशी योग्य तारीख लिहिली आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण एकाच दिवशी, एकाच विमानाने मुंबई येथे परतले आणि तेथूनही एकाच रेल्वेने उस्मानाबाद शहरात दाखल झाले, असे असतानाही त्यांच्या नावसमोरील राखण्यात तारखांचा घोळ घाकण्यात आला आहे. ही यादी सगळीकडे प्रसारित झाल्यामुळे या सहजणांसह उर्वरित 63 जणांचीही डोकेदुखी वाढली आहे.

यादीतील बहुतेक प्रवाश्यांच्या नावापुढे 19 मार्च अशीच तारीख डकवण्यात आली आहे. परतलेल्या देशाचे नाव असा एक रखाना आहे त्यात पुणे आणि लदाख या शहरांची नावे लिहिली आहेत. तर या यादीत चार प्रवाश्यांच्या नावसमोरील देशाच्या राखण्यात निरंक असा शेरा मारण्यात आला आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली असून यातील एकहीजण कोरनामुळे संक्रमित झालेला नाही. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दररोज सकाळी न चुकता फोन केला जातो. तब्येतीची विचारणा केली जाते. काळजी घेण्याची सूचना दिली जाते मात्र चुकीची माहिती निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील त्यात सुधारणा करण्यात आली नाही हे विशेष.

जिल्हा प्रशासनामुळेच मनस्ताप – ढवळे

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी घेणारांकडून गुप्त माहितीचा मात्र जोरात फैलाव केला जात आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांची यादी सगळीकडे पोहचली आहे. अनेकजण कपाळावर आठ्या आणून पाहत आहेत. आम्हाला विदेशातून परत येऊन 37 दिवस झाले आहेत. आम्ही सगळेच ठणठणीत आहोत मात्र कुटुंबातील सदस्यांना आणि आम्हला अनेकांच्या संशयाला बळी पडावे लागत आहे. रेल्वे आणि विमानाची तिकिटांसह सर्व पुरावे दाखविले आहेत. तहसीलदार गणेश माळी यांनी तर आम्हाला तेवढेच काम आहे काय असे म्हणत पिटाळून लावले. 30 मार्च रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याकडे चुकीची माहिती वगळा आणि मनस्तापातून मुक्त करा अशी विनंती केली आहे. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली गेली नसल्याचे दुबईहुन परतलेले राज ढवळे यांनी सांगितले.