करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे.

देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. मुंबई आणि पुण्यात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत.

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी दिला आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करत आहेत. मात्र आता SRPF अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण केलं जाईल. तसंच जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केली आहे. ओडिशा राज्याने तर आधीच एप्रिल अखेपर्यंत लॉकडाउन जाहीर करुन टाकला आहे. तसंच पंजाब सरकारनेही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये Covid-19 चाी लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पंजाबमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.