वसईत आज करोनामुळे पहिला  बळी गेल्याची नोंद झाली. ६४ वर्षीय व्यक्तीवर वसईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यात करोनाची लक्षणे आढळल्यानंतर तपासणी करण्यात आली.  अखेर त्यांना करोनाची लागण झाल्याचे गुरूवारी जाहीर करण्यात आले.

या व्यक्लीला परदेशी प्रवासाचा कुठलाही पुर्वइतिहास नव्हता. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. वसईतील हा पहिला करोना बळी आहे.त्यामुळे नेमकी लागण कशी झाली त्याचा शोध सुरू आहे. सदराचा पूर्ण परिसर बंद केला असून त्यांच्या घरच्यांना सुद्धा अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नसलेला आणि करोनाची लागण झालेला हा वसईतील पहिला रुग्ण आहे.
वसईत करोनाचे एकूण ९ रुग्ण आहेत.

राज्यभरात आतापर्यंत ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या थेट ४१६ झाली आहे. पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये तीन, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच, बुलढाण्यात १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ४१६ वर गेली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारी ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ड देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.