जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 24 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 677 वर पोहचली आहे.  तर आज दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत औरंगाबादेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 17 वर पोहचली आहे.

आज मृत्यू झालेल्या दोन महिला बीडबायपास येथील अरुणोदय कॉलनी व  हुसेन कॉलनी येथील होत्या. मंगळवारी रात्री त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

आणखी वाचा- चिंताजनक! नाशिकमध्ये नवे १७ पोलीस करोनाग्रस्त; २ एसआरपीएफ जवानांचा समावेश

औरंगाबाद शहरात गेल्या आठ दिवसांपासून सरासरी करोनाबाधितांचा आकडा १५ ते १७ असा येत आहे. मालेगावहून आलेल्या राज्य राखीव दलातील जवान एकाच वेळी बाधित झाल्याने शुक्रवारी संख्या अचानक शंभराने वाढली होती. वस्त्यांमधून करोना रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान आतापर्यंत शहराता 117 जण करोनामुक्त झाले आहेत.

आणखी वाचा- अकोल्यात दीड वर्षीय चिमुकल्यासह आणखी नऊ करोनाबाधित

तर आज आढळून आलेल्या नव्या 24 रुग्णांमध्ये जालन्यातील एका रुग्णाचाही समावेश आहे. अगोदरच रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबादकरांच्या चिंतेत करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकच भर पडत आहे.  शहरातील रामनगर, संजय नगर, भावसिंगपुरा, नवयुग कॉलनी, आरटीओ कार्यालयाचा परिसर, पदमपुरा, नंदनवन कॉलनी, भुजबळ नगर, पुंडलीक नगर, गांधी नगर, जय भवानी नगर, विजय नगर, सातारा परिसर, एन आठ, रहेमानिया कॉलनी, भडकल गेट, अरुणोदय कॉलनी, गारखेडा परिसर या भागात आज करोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.