News Flash

गुलाबी बोंडआळीमुळे  बीटी कापूस धोक्यात

जनुकबदल कपाशीच्या पिकाकडे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाला असून उत्पादनात वाढ झाली.

जनुकबदल कपाशीची (बीटी) प्रतिकारक्षमता कमी झाल्याने यंदा गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट आली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा  प्रथमच दुबार पीक म्हणजे फरदड (खोडवा) शेतकऱ्यांना राखता आलेला नाही. गुजरातनंतर राज्यात कपाशी पिकापुढे भविष्यात मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जनुकबदल कपाशीच्या पिकाकडे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाला असून उत्पादनात वाढ झाली. बीटी कपाशीचे मुख्य पीक निघाल्यानंतर दुबार पीक म्हणजे फरदड घेतले जात असे. मात्र यंदा धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद या भागांत कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मुख्य पिकानंतर फरदड घेता आले नाही. मागील वर्षीही गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कृषी विभागानेच फरदड घेऊ नये, असे आवाहन केले होते. मात्र नफ्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी हा सल्ला न मानता फरदड घेतले; पण गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पीक मोडून टाकावे लागले.

बोंडआळीला प्रतिकारक जनुक बीटी बियाणांमध्ये असते. किमान १०० दिवस कपाशीत विष तयार होते. त्यामुळे बोंडआळीने कपाशीचे पाने खाल्ली की, त्या मरतात. मात्र ४ ते ५ वर्षांपासून प्रतिकार क्षमता कमी होऊ लागली आहे. जादा कालावधीचे पीक, केवळ मादी वाणातच जनुक टाकले, नर वाणात जनुक नसणे, मूळ संकरित वाणावरच जनुकबदल बियाणांची निर्मिती तसेच अनेक कंपन्यांचे अनेक प्रकारचे बीटी बियाणे बाजारात असणे आदी कारणांमुळे प्रतिकार क्षमता कमी होत आहे. मागील वर्षी प्रतिकार क्षमता कमी झाल्याने राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बीटी कपाशीच्या बियाणांच्या किमती कंपन्यांना कमी करायला लावल्या होत्या. पूर्वी स्वामित्व शुल्काची रक्कम प्रति पाकीट ८३ रुपये होती. ती घटवून ४९ रुपये करण्यात आली. त्यामुळे बियाणांची किंमत ९३० रुपयांवरून ८०० रुपये करण्यास भाग पाडण्यात आले होते. बियाणे नियंत्रण कायद्याचा बडगा दाखवून या किमती सरकारने कमी केल्या होत्या. यंदा पूर्वीपेक्षा जास्त बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्याने स्वामित्व शुल्क घटवून बीटी बियाणांच्या किमती आणखी कमी केल्या जाण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कंपन्या दोषी, सरकारकडून कारवाई

जनुकबदल बियाणांना परवानगी देण्याचा निर्णय करताना काही उणिवा राहिल्या. बीटी कंपन्यांनी जास्त कालावधीच्या जातीचे कपाशीचे बियाणे तयार केले. तसेच केवळ मादी वाणातच जनुक वापरले, नर वाणात वापरले नाही. संकरित वाणावरच वापर झाला. देशी वाणाचा विचार केला नाही. त्यामुळे गुजरातनंतर आता राज्यात गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मागील वर्षी सरकारने स्वामित्व शुल्क कमी करून बीटी बियाणांच्या किमती कमी केल्या होत्या. तंत्रज्ञान चांगले आहे, पण वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला. आता सार्वजनिक क्षेत्रातील संस्था देशी वाणावरील जनुकबदल बियाणेनिर्मिती करीत आहेत. आता कंपन्यादेखील तसा विचार करू लागल्या आहे. मागील वर्षीपासून प्रतिकार क्षमता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. बीटी बियाणांच्या निर्मितीत ४९ कंपन्यांचे २ हजार संकरित वाण असून त्यांच्या मनमानीमुळे काही दुष्परिणाम झाले आहेत. मात्र सरकार त्याबाबत सजग आहे.

डॉ. केशव क्रांती संचालक, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

राज्य सरकारकडून जनजागृती

बीटी कपाशीवर नोव्हेंबरनंतर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये या संदर्भात कृषी विभागाने जनजागृती केली आहे. बियाणेनिर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर बठका सुरू असून कमी कालावधीच्या तसेच दर्जेदार बियाणेनिर्मिती करण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेले आहे. कृषी विभाग गेल्या वर्षीपासून या प्रश्नाकडे विशेष लक्ष देत आहे.

विकास देशमुख, आयुक्त, कृषी विभाग

बीटी बियाणांतील प्रतिकार क्षमता आता कमी झाली असून गुलाबी बोंडआळीत बीटी वाणाबद्दलची प्रतिकार क्षमता वाढीस लागली आहे. त्यामुळे आता कपाशीचे २५ ते ३० टक्के नुकसान काही भागांत होऊ लागले आहे. बीटी कपाशीचे पीक करताना शेताच्या चारही बाजूंनी रेफ्युजी म्हणजे देशी वाण लावले गेले नाही. त्यामुळे आळीमधील प्रतिकार क्षमता वाढीस लागली. आता फरदडवर त्याचा जास्त प्रादुर्भाव होत आहे.

डॉ. अशोक ओंकार पाटील, निवृत्त कृषी शास्त्रज्ञ, जळगाव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:33 am

Web Title: cotton crop issue
Next Stories
1 सोलापूरच्या ग्रामीण भागात वेळा अमावास्येची पर्वणी
2 सुट्टीच्या दिवशी द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना बंदी
3 रायगडात शिवसेना-भाजप युतीचे संकेत 
Just Now!
X