राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये, “२०१४-२०१९ दरम्यान राज्यामध्ये भाजपा शिवसेनेबरोबर युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. खास करुन काही कठीण निर्णय वेगाने घेता आले असते,” असं मत नोंदवलं आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि अशोका विद्यापिठातील त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटाने संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान फडणवीस यांनी हे मत मांडले. या सोहळ्यामध्ये फडणवीस यांनी काँग्रेचे नेते आणि माजी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्याशी गप्पा मारताना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. प्राध्यापक प्रदीप छिब्बेर आणि हर्ष शाह यांनी लिहिलेल्या इंडिया टुमॉरो : कॉनव्हर्सेसशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लिडर्स या पुस्तकाचे प्रकाश यावेळी करण्यात आलं.

“शिवसेना जरी सत्तेमध्ये होती तरी…”

या संवादादरम्यान देवरा यांनी तुम्हाला राष्ट्रीय राजकारणामध्ये जाण्यात रस आहे का असा प्रश्न फडणवीस यांना विचारला. त्यावेळी फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले. ज्या पक्षाबरोबर युती होती त्याच पक्षाबरोबर सत्ता संघर्ष होत असल्याने तुम्हाला राज्य सोडून केंद्रात जाता येत नाहीय का असा पुढील प्रश्न देवरा यांनी विचारला. त्यावर बोलताना फडणवीस यांनी, “त्या पाच वर्षींमधील कारभार सुरळीत झाला असला तरी तो त्रासदायकही होता. हे का घडत आहे असं या पाच वर्षांच्या काळात अनेकदा वाटलं,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी “शिवसेना जरी सत्तेमध्ये होती तरी सरकारने काही निर्णय घेतल्यानंतर ते स्वत:ला विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेत टीका करायचे,” असंही म्हटलं आहे. “मात्र काही काळाने तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. मी त्यानंतर मला हवं ते मी करणार अशा भूमिकेत गेलो. मी माझ्या मंत्रीमंडळाचा कारभार करताना अनेक निर्णय हे एकमताने घेतले. मला यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागायची. अनेकदा मला पडद्यामागे अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागायची. एखाद्या विषयावर एकमत असावे म्हणून अनेकदा बैठकी आणि संवाद घडवून आणावे लागायचे. त्याऐवजी एकाच पक्षाचे सरकार असते तर काम अधिक चांगले आणि वेगाने झाले असते,” असं फडणवीस म्हणाले.

राजकारणातील युतीवरही झाली चर्चा

सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती ही अनैसर्गिक असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मात्र त्याचबरोबर राज्यामधील युतीचे राजकारण पुढील १० ते २० वर्षांच्या कालावधीसाठी कायम राहणार असल्याचे मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं. शिवसेना आणि काँग्रेस कधी एकत्र येईल असं वाटलं नव्हतं, असं मत राजकारणातील युतीबद्दल बोलताना देवरा यांनी व्यक्त केलं. सक्तीच्या राजकारणामुळे अशा युतीचे निर्णय़ घ्यावे लागतात तसेच भाजपा हा मजबूत असेपर्यंत अशाप्रकारची युती होत राहिल असे मतही देवरा यांनी नोंदवले.

राजकीय विरोधक राजकीय शत्रू होऊ लागलेत

एखाद्या विषयावर एकतम होऊन चर्चा करण्यासंदर्भातील राजकारणातील विचारसणीबद्दलही देवरा यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी २००५ मध्ये नवी मुंबईतील सर्व खासदार कशाप्रकारे नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटले होते याबद्दलीच आठवण सांगितली. याच विषयावर बोलताना फडणवीस यांनी मागील १० ते २० वर्षांमध्ये राजकारणामध्ये ‘राजकीय अस्पृश्यता’ वाढत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राजकीय विरोधक हा राजकीय शत्रू होता कामा नये असं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सांगायचे अशी आठवण फडणवीस यांनी करुन दिली. याबद्दल महाराष्ट्रातील परिस्थिती अद्यापही चांगली आहे. मात्र दक्षिणेतील आणि उत्तरेकडी काही राज्यांमध्ये राजकारणामधील विरोधक शत्रू झाले आहेत. सर्वच पक्षांनी एकत्र येऊन याबद्दल आत्मचिंतन करुन या विषयावर चर्चा घडवून आणली पाहिजे असं फडणवीस म्हणाले.