करोनाग्रस्तांच्या झपाटय़ाने वाढणाऱ्या संख्येमुळे भयग्रस्त बनलेल्या कराड तालुक्याला येथील कृष्णा रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळत आहे. करोनाविरूध्दच्या लढाईत कृष्णा रुग्णालयाची कामगिरी प्रशंसनीय राहिली असून, येथून आज शुक्रवारी ८७ वर्षांचे आजोबा व ३ वर्षांच्या मुलासह ६ जण करोनामुक्त होऊन स्वगृही परतले. दरम्यान, कृष्णाच्या प्रयोगशाळेत कोव्हिड-१९ च्या चाचण्यांना प्रारंभ झाला आहे.

कराड तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहचली असून, त्यात सर्वाधिक ३६ रुग्ण कराडनजीकच्या वनवास माचीतील आहेत. तर, निष्पन्न झालेल्या रुग्णांपैकी बहुतेक रुग्ण हे कराड व मलकापूर शहरासह त्यालगतच्या १० किलोमीटरमधील असून, या रुग्णसाखळीने करोनाबाधितांची संख्या धडकी भरवणारी ठरली आहे. हे सर्व रुग्ण कृष्णा हॉस्पीटल व येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. कृष्णा रुग्णालयातून आजवर १२ करोनाग्रस्त उपचारांती सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यात डेरवण (ता. पाटण) येथील १० महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात ४० हून अधिक करोनाबाधित उपचार घेत असून, हे सर्व रुग्ण लवकरात लवकर उत्तम आरोग्यस्वास्थ्य घेऊन स्वगृही परततील असा विश्वास कृष्णा विश्वस्त न्यासाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला आहे.

चाचण्यास प्रारंभ

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली व नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने कृष्णा हॉस्पिटलला कोव्हिड-१९च्या चाचण्या करण्यास नुकतीच परवानगी दिली होती. यानंतर लगेचच कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या ‘मोल्युक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्स’ या विभागामार्फत कोव्हिड-१९च्या चाचण्या केल्या जात आहेत. दररोज किमान ४० जणांच्या घशाच्या स्त्रावांचे नमुने चाचणी करण्याची क्षमता येथे उपलब्ध करण्यात आली आहे.