देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इजेक्शन, लस आदींसह औषध तुटवडा निर्माण झाला आहे. भारतावर आलेल्या या संकटात मदतीसाठी जगभरातील देशांकडून हात पुढे करण्यात आलेला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून करोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र तरी अद्याप देखील संसर्ग कमी झालेचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे.

सोनिया गांधींच्या या संदेशाची एक व्हिडिओ क्लिप काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये त्या म्हणातात, “ प्रिय, बंधू-भगिनींनो नमस्कार, करोना महामारीच्या आव्हानात्मक काळात तुम्ही व तुमच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी व चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करते. ते लाखो कुटुंब ज्यांनी आपले स्नेहीजन गमवले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. आपला देश या क्षणी करोनाच्या जीवघेण्या संकटाला तोंड देत आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे लाखोंच्या संख्येत आपले स्नेहीजन करोनाबाधित होत आहेत. हे संकट म्हणजे सर्व देशवासियांसाठी परीक्षेची वेळ आहे. आपल्याला एकमेकांचा हात धरून, एकमेकांचा आधार आणि एकमेकांची ताकदही बनायचं आहे.”

“मोदी सरकारने लक्षात घ्यावं लढाई करोना विरोधात आहे, काँग्रेस किंवा राजकीय विरोधकांविरुद्ध नाही”

तसेच, “ मला माहिती आहे सद्य परिस्थिती ही माणुसकीला हलवणारी आहे. कुठं ऑक्सिजनची कमतरता तर कुठं औषधांचा तुटवडा आहे आणि अनेक रूग्णालयांमध्ये बेड नाहीत, ही परिस्थिती देशातील बहुतांश राज्यांमध्ये निर्माण झालेली आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरात व बाहेर असताना संपूर्ण सावधगिरी बाळगा. स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालून नका, जेवढी शक्य होईल तेवढी एकमेकांची सर्वोतोपरी मदत करा.” असं त्यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.

सरकारचे लसीकरण धोरण भेदभावजनक, असंवेदनशील : सोनिया गांधी

तर, “ केंद्र व राज्य सरकारांसाठी ही वेळ जागे होण्याची व कर्तव्य निभवण्याची आहे. माझा केंद्र सरकारकडे आग्रह आहे, त्यांनी सर्वात अगोदर गरिबांचा विचार करावा व त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात संकट संपेपर्यंत ६ हजार रुपये जमा करावेत. देशात करोना चाचण्या वाढवल्या जाव्यात, औषधी, ऑक्सजन व रूग्णालयांचा युद्धपातळीवर प्रबंध केला जावा. सर्व देशवासियांचे करोनापासून बचावसाठी मोफत लसीकरण व्हावे, जेणेकरून लोकांना वाचवलं जाऊ शकेल. करोना वॅक्सनीचे अनिवार्य परवाने दिले जावेत, जेणेकरून कमी वेळात सर्वांना लस मिळेल. लसींच्या किंमतीचा भेदभाव बंद व्हावा. जीवनरक्षक औषधांचा काळाबाजार बंद व्हावा. सर्व औद्योगिक ऑक्सजन हे रूग्णालयांना देण्याची व्यवस्था व्हावी. देशातील सर्व राजकीय पक्षांच्या सहमीतने राष्ट्रीय पातळीवर कोविडचा सामना करण्याचे धोरण बनवले जावे.” अशा सूचना देखील यावेळी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला केल्या आहेत.

करोनाविरोधातील लढा पक्षीय सीमारेषांपलीकडे : सोनिया गांधी

याचबरोबर “या निमित्त मी करोनाशी लढत असलेले सर्व डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम करते. जे आपला प्राण पणाला लावून रूग्णांचा उपचार करत आहेत. मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की या संकटातून सुटण्यासाठी एकजूट होणं हाच मोठा मंत्र आहे. आपल्या देशाने या अगोदर देखील मोठमोठ्या संकटांचा यशस्वीपणे सामना केलेला आहे. काँग्रेस पक्ष देशाला कोविड संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून उचललेल्या जाणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या पावलावर साथ देईल. मला संपूर्ण आशा आहे की तुम्ही करोना संकटाचे गांभीर्य समजून एक नागरीक म्हणून आपले भरीव योगदान द्याल. आशा करते की, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातू देश या संकटातून बाहेर पडण्यात लवकरच यशस्वी होईल.” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्ते केला आहे.