14 December 2019

News Flash

वृद्ध आईचा सांभाळ न करता भूखंड हडपला; मुलावर गुन्हा

सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात हा प्रकार उजेडात आला.

एकेकाळी ऐश्वर्याचे जीवन जगलेल्या मातेचा वृद्धापकाळी सांभाळण्याचे कर्तव्य पार न पाडता उलट, तिच्या मालकीचा चार हजार चौरस फुटाचा भूखंड हडप करून तिला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या पुत्राविरूध्द पोलिसांनी अखेर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात हा प्रकार उजेडात आला.

दत्तुबाई विठ्ठलराव आडम (वय ७५, रा, कॉ. गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहत, कुंभारी, सोलापूर) या पीडित वृध्द महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा मुलगा बालाजी आडम याच्या विरूध्द फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दत्तुबाई आडम यांचे पती विठ्ठलराव आडम यांनी स्वकष्टाने अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात भूखंड घेऊन मेकॅनिकल वर्कशॉप उभारले होते. दत्तुबाई यांना तीन मुले व तीन मुली आहेत. या सर्वाचे विवाह झाले आहेत. परंतु दत्तुबाई यांना एकही मुलगा सांभाळत नसल्यामुळे त्या आपल्या बहिणीकडे कुंभारी येथे कॉ. गोदूताई परुळेकर विडी कामगार घरकुल वसाहतीत राहतात. १९९८ साली त्यांच्या कुटुंबीयांनी अशोक चौकातील जागेची वाटणी केली असता श्रीनिवास व राजशेखर या दोन मुलांना प्रत्येकी चार हजार चौरस फूट आकाराचा भूखंड मिळाला. उर्वरित जागा तिसरा मुलगा बालाजी याच्या हिश्श्याला आली. नंतर संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला असता समाजातील लवादाने न्यायनिवाडा केला. त्यात दत्तुबाई यांच्या वाटणीला आलेली चारशे चौरस फुटाची जागा मुलगा बालाजी यास वापरण्यासाठी द्यायची आणि त्या मोंबदल्यात बालाजीने आई दत्तुबाई यांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. तसेच पुढील काळात जागा मुलगा बालाजी यास विकायची ठरल्यास त्यासाठी श्रीनिवास व राजशेखर या अन्य मुलांच्या संमतीने विक्री व्यवहार करण्याचे ठरले होते. परंतु पुढे मुलगा बालाजी याने आईच्या मालकीची जागा परस्पर हडपली. तिला दरमहा द्यावयाची रक्कम दिली नाही. २०१६ साली जागेची वाटणी नोंदणीकृत खरेदी झाली, तेव्हा बालाजी याने आई दत्तुबाई यांना फसवून त्यांच्या सह्य़ा घेतल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.

First Published on November 23, 2019 2:53 am

Web Title: crime against a child grabbed plot without taking care of old mother akp 94
Just Now!
X