प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आंबा पीक विमा योजना यंदाही लागू करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.
यापूर्वी संत्री, मोसंबी, द्राक्षे, डाळिंब इत्यादी फळ पिकांसाठी शासनाने विमा योजना जाहीर केली होती. त्यामध्ये कोकणातील काजूचा समावेश होता, पण आंब्याचा नव्हता. शासनाने यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार आता तो आंबा उत्पादकांसाठीही लागू झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहा हजार रुपयांचा हप्ता (प्रीमियम) भरायचा असून त्यावर एक लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्य़ातील किनारपट्टीपासून पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत आणि पंधरा किलोमीटर बाहेरील अंतरावर असलेल्या बागांसाठी वेगळे निकष आहेत. किनारपट्टीजवळील भागांसाठीच्या निकषामध्ये अवेळी पावसाचा कालावधी १ जानेवारी ते १५ एप्रिल असून १६ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत १० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास विमा योजनेचा लाभ मिळू शकेल. कमी तापमानासाठी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी हा कालावधी असून त्यामध्ये १०.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान हा निकष आहे, तर जास्त तापमानासाठी १५ मार्च ते ३१ मे या कालावधीत ३७.५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असणे योजनेच्या लाभासाठी आवश्यक आहे. १५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील भागामध्ये हेच तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
दरम्यान आंब्यासाठी विमा योजनेचे निकष ठरवताना तापमानाच्या कालावधीमध्ये मार्च महिन्याचा समावेश करावा, अशी सूचना येथील आंबा बागायतदारांनी केली होती. मात्र त्याची नोंद घेऊन निकषामध्ये बदल करण्यात आलेला नाही. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत विमा उतरवलेल्या २ हजार ९३३ आंबा बागायतदारांपैकी १ हजार २९६ जणांना या योजनेचा लाभ मिळाला. रत्नागिरी जिल्ह्य़ातील या बागायतदारांना विम्यापोटी २ कोटी ३२ लाख ७९ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
आंबा उत्पादकांसाठी पीक विमा योजना लागू
प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आंबा पीक विमा
First published on: 06-11-2013 at 04:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop insurance implement for mango farmers in konkan