धवल कुलकर्णी

गुन्हेगारी जगत आणि त्यांचे गुन्हे करण्याचे स्वरूप सुद्धा बदलत आहे. सराईत गुन्हेगार हे ब्लू कॉलर गुंडांकडून सायबर क्राईमसारख्या व्हाईट कॉलर गुन्ह्यांकडे वळत आहेत. याचे एक कारण म्हणजे या अशा गुन्ह्यांची उकल होण्याचे कमी प्रमाण.

महाराष्ट्रामध्ये सन 2015 ते 2019 च्या दरम्यान झालेल्या एकूण एक तृतीयांश गुन्हे पोलिसांकडून सोडवण्यात आले आहेत. आमदार अॅड. आशिष शेलार आणि इतर आमदारांनी विचारलेल्या राज्यातल्या सायबर गुन्ह्यांमध्ये झालेल्या वाढीच्या संदर्भात या प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत हे मान्य केले.

त्यांच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, राज्यात सन 2015 ते 2019 यादरम्यान एकूण 16,515 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 4,532 ची उकल झाली आहे आणि 6,020 आरोपींना अटक करण्यात आली आहे. देशमुख यांनी असे म्हटले आहे की, बँकांकडून कागदपत्रांची पडताळणी न झाल्याने बऱ्याच गुन्ह्यात बँकांकडून पोलिसांकडे तक्रारी दाखल होत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे होण्यासाठी विविध पोलीस घटकातील एकूण 3,253 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि तसेच राज्यातील सर्व पोलीस सायबर लॅब आणि सायबर ठाण्यांना गुन्ह्याच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री म्हणजेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरविण्यात आले आहेत.