काही भाग कोसळून दुर्घटनेची शक्यता; तातडीने उपाययोजना करणे गरजेचे

निसर्गप्रेमींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्य़ातील हरिश्चंद्रगडावरील (ता. अकोले) प्रसिद्ध कोकणकडय़ाच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून, त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कडय़ाचा वरचा काही भाग येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता आहे. कोकणकडय़ावर वर्षभर असणारी पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता दुर्घटनेची शक्यता आहे. ती लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे.

नगर आणि पुणे जिल्हय़ाच्या सीमेवर उभ्या असणाऱ्या हरिश्चंद्रगडाला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. गडाच्या परिसरातील कातळशिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, प्राचीन वास्तुकलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेण्यांचा समूह, समृद्ध वनसंपदा यामुळे  दुर्गप्रेमी, वनस्पती अभ्यासक, हौशी पर्यटक, भाषा आणि संस्कृती अभ्यासक तसेच सर्वसामान्य श्रद्धाळूंनाही हा गड साद घालत असतो.

सुमारे दोन हजार फूट उंचीच्या अंतर्वक्र नालाकृती कोकणकडय़ाची सर सहय़ाद्रीच्या अन्य कोणत्याच कडय़ाला नाही. याच कोकणकडय़ावर कॅप्टन साइस या इंग्रज अधिकाऱ्याला प्रथम इंद्रवज्र म्हणजे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसले होते. पश्चिमेच्या दरीतून वर येणारे धुक्याचे लोट, पूर्वेकडून येणारा सूर्यप्रकाश आणि रिमझिम पाऊस अशा विशिष्ट वेळी हे इंद्रवज्र दिसते. अलीकडच्या काळातही अनेक दुर्गप्रेमींना या इंद्रवज्राचे दर्शन झाले आहे.

पर्यटकांना कडय़ाच्या टोकाचा हा भाग लोंबणारा (पुढे आलेला) असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकणकडय़ाच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे. वन खात्याने काही दिवसांपूर्वी भेगेच्या अलीकडे सुमारे दोन फूट अंतरावर लोखंडी कठडे बसवले होते. पण त्याचे सर्व पाइप चोरीला गेले असून, कठडय़ाचे आता तेथे नामोनिशाणही नाही. हरिश्चंद्रगडाचा हा परिसर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा भाग असून तो वन्य जीव विभागाच्या ताब्यात आहे.

 

धोका नक्की काय ?

’कडय़ाच्या टोकापासून सुमारे पाच ते

दहा फूट अंतरावर भेग असून, येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे

’कोकणकडय़ावर सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता.

’कडय़ाचा पुढे आलेला भाग धोकादायक बनला असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता.