केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यामध्ये राणेंची अटक आणि रात्री उशीरा सुटका असं राजकीय नाट्य पहायला मिळालं. काल दिवसभर महाराष्ट्रामध्ये जागोजागी शिवसैनिक आणि भाजपा समर्थक आमने सामने आल्याचं चित्र दिसून आलं. मात्र दुसऱ्या दिवशीही या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशाच आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. भुतडा यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधिंशी बोलताना ही माहिती दिलीय. उमरखेड, यवतमाळ, उसदसहीत एकूण पाच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचं भुतडा यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरे बोलले योगी आदित्यनाथ यांना चपलांनी मारलं पाहिजे. ते योगी आहेत त्यांनी कुठं तरी जाऊन बसावं. त्यांनी कशाला मुख्यमंत्री होऊन राजकारण करावं, असं मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये म्हटल्याचा व्हिडीओ मी पाहिला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच मी जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील इतर भाजपा कार्यकर्त्यांनाही गुन्हे दाखल करण्यास सांगितलं आहे,” असं भुतडा म्हणाले. “जे राणे बोलले त्यापेक्षा उग्र स्वरुपाची त्यांची भाषा होती. ज्या सेक्शन अंतर्गत राणेंविरोधात तक्रारी दाखल केल्या त्याच सेक्शन अंतर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे,” असं भुतडा म्हणाले.

“फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल केले तर जी तत्परता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल केला. सर्वोच्च न्यायलायाने सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आधी ज्याच्याविरोधात तक्रार आहे त्याला बोलवून जबाब नोंदवून नंतर अटक करणं गरजेचं आहे असं वाटलं तरच अटक केली पाहिजे. असा निर्णय असतानाही राणेंना अटक केली. काल दिवसभर प्रसारमाध्यमांपासून भाजपापासून सर्वांना कामाला लावलं. राज्याला वेठीस धरण्याचं काम काल सरकारनं केलं. सत्तेत असलेल्या पक्षाने संयमाने वागलं पाहिजे. संयम काल दाखवला नाही. एवढं ट्रान्सफरंट काम करता तर ती उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हे दाखल करतानाही दाखवा. गुन्हे दाखल केले नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करु,” असा इशाराही भुतडा यांनी दिलाय.

 

काल नारायण राणेंना अटक झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर महाराष्ट्राबाहेरील हिंदी पट्ट्यातील राज्यांमधून उद्धव ठाकरेंना अटक करा अशा पद्धतीची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेण्ड होत होता.