बहुजनांचे कल्याणासाठी महाविकास आघाडी शासन सदैव तत्पर आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्वानुसार सरकार काम करत आहे. यापुढेही असेच लोककल्याणकारी काम सुरू राहील. चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी समतोल विकासाची हमी देत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, खार जमीन विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांच्यासह प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, “जिल्ह्यात करोनावर प्रभावी नियंत्रण ठेवले. करोना प्रतिबंधासाठी जम्बो उपचार सुविधांची निर्मिती करून आरोग्य व्यवस्था बळकटी करणावर विशेष भर देण्यात आला. पूरग्रस्तांना तातडीने मदत केली. या पुरग्रस्त भागासाठी ४२ कोटींची मदत मंजूर करून त्यातील ३६ कोटींची मदत वाटप केली आहे. ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ५३ हजार ३३६ शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ देण्यात आला असून, त्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची ३१२ कोटी ४४ लाख रुपये रकम जमा करण्यात आली आहे. या खरीप हंगामात विविध बँकेच्या माध्यमातून १ लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटी रुपयाचे खरीप पीक कर्ज वाटप झाले आहे. गरीब व गरजू नागरिकांना पोट भरण्यासाठी जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून सुमारे ६ लाख शिवभोजन थाळी केवळ पाच रुपये दरात उपलबध करून देण्यात आली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अतिरिक्त ७०० रुपये बोनस दिला आहे. देणारे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी शासन, हे देशातील एकमेव सरकार आहे. जिल्ह्यात एकूण ५९ केंद्रावरून आतापर्यंत ४ लाख ३७ हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली.” असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, “बचत गटांना कर्ज वाटपामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. ताडोबा पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज ग्रुप बरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला असून. महेंद्र क्लब, लि-मेरीडीअन, रेडीसन ब्ल्यू यासारखी पंचतारांकीत हॉटेल्स या भागात येवू पाहत आहेत.” असेही वडेट्टीवार म्हणाले.

“मागील ४० ते ५० वर्षांपासून पुनर्वसन धोरण नव्हते ते नवीन धोरण आणण्याचा निर्धार शासनाने केला आहे. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाज्योतिची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून २० हजार विद्यार्थ्यांना जे.ई.ई., ए.ई.ई.ई. व एन.ई.ई.टी साठी आणि युपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी दोन ओ.बी.सी. वस्तीगृह बांधण्यात येणार आहे. तसेच या मागास प्रवर्गातील ६० विद्यार्थ्यांना व्यावसायीक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधीत कंपन्यांशी करार करण्यात येणार आहे.” असे वड्डेटीवार यांनी यावेळी सांगितले.

“जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी आणि देखणी इमारत उभी करण्याचा, तसेच जिल्ह्यातील ४०० अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. संकटकाळी नागरिकांना मदत करता आली, लोकांच्या जवळ जाता आले. तसेच बहुजन कल्याण खात्याचा मंत्री म्हणून बहुजन समाजाच्या तरुणांसाठी महत्वाचे व ठोस निर्णय घेता आले. या सर्व कामातून सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची मला संधी मिळाली” असं वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धांचा सन्मान केला गेला. कार्यक्रमाचे संचलन मोंटूसिंग व मंगला घागी यांनी केले.