राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांना दणका देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे मानकर यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून लवकरच पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. कारण, यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या तिन्ही खंडपीठांनीही मानकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास असमर्थता दर्शवली होती.

पुण्यातील इस्टेट ब्रोकर जितेंद्र जगताप (५३) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मानकर यांच्यावर आरोप आहे. जगताप यांनी २ जून रोजी घोरपडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर यांच्यासह अनेकांना जबाबदार धरलं होतं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

मानकर यांनी आधी पुणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरल्याने त्यांनी तातडीने उच्च न्यायालयात अर्ज केला आणि आता मुंबई उच्च न्यायालयानेही मानकरांना दणका दिला आहे.