पावसाने पंधरा दिवसांची अखंड विश्रांती घेतल्याने ६० हजार हेक्टरवरील धानाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर रोवणी झालेले ७६ हजार हेक्टरमधील धान पिवळे पडायला सुरुवात झाली आहे. येत्या पाच दिवसात पाऊस झाला नाही तर धान, सोयाबीन, तूर व कापसाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. दरम्यान, प्रचंड उष्णतेमुळे उंट व लष्करी अळीच्या प्रकोपाने पीक नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्र असलेल्या या जिल्ह्य़ाकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला. याच पावसात शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व धानाची पेरणी केली, परंतु ऑगस्ट उजाडत नाही तोच पाऊस अखंड विश्रांतीवर गेला आहे. ४ ऑगस्टपासून या जिल्ह्य़ात एक थेंब पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. गेल्या वर्षी अती पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. त्यामुळे यंदा चांगली शेती करायची, या इराद्याने शेतकऱ्यांनी बॅंका, सहकारी सोसायटी, खासगी सावकारांकडून कर्ज काढून कशाबशा पेरण्या उरकल्या. मात्र, पावसाच्या अखंड विश्रांतीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आज बहुतांश तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस व तुरीचे पीक पिवळे पडायला किंवा वाळायला सुरुवात झाली आहे. वरोरा, भद्रावती, चिमूर, कोरपना व जिवती या तालुक्यांमध्ये तर परिस्थिती भयानक आहे.
पावसाळ्यात हिरव्यागार दिसणारी या परिसरातील शेती दूपर्यंत आज कोरडी ठणठणीत दिसत आहे. या जिल्ह्य़ात भाताचे एकूण क्षेत्र १ लाख ३६ हजार हेक्टर आहे. धानाचा पट्टा अशी ओळख असलेल्या ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, चिमूर, गोंडपिंपरी व पोंभूर्णा परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. पावसाच्या अखंड विश्रांतीने ६० हजार हेक्टरवरील धानाच्या रोवण्या शिल्लक आहे, तर रोवणी झालेले ७६ हजार हेक्टरवरील धान पिवळे पडण्यास सुरुवात झाली आहे. आणखी पाच दिवस पाऊस झाला नाही तर अतिशय भयंकर परिस्थिती ओढवेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक काथोडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. या जिल्ह्य़ात १५ ऑगस्टनंतरही धानाच्या रोवण्यांची कामे होतात. मात्र, पाच दिवसापेक्षा अधिक विलंब झाला तर त्याचा थेट परिणाम धान उत्पन्नावर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रोवणी झालेले धान पिवळे पडत असल्याने सिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, परंतु घोडाझरी, असोलामेंढ हे मोठे सिंचन प्रकल्प केवळ ६५ ते ७० टक्केच भरले असल्याने परिस्थिती नाजूक आहे. अशा सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडले तर परिस्थिती चिघळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तिकडे पावसाअभावी सोयाबीन, कापूस व तूर पिकाच्या वाढीवर परिणाम झालेला आहे. सोयाबीनचे शेंगामध्ये दाणे भरत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे कापूस, तूर व सोयाबीनच्या उत्पादनावरही गंभीर परिणाम होणार असल्याची माहिती काथोडे यांनी दिली. पावसाअभावी प्रचंड उष्णतेमुळे धान व सोयाबीनवर लष्करी व उंट अळीने आक्रमण सुरू केले आहे. भद्रावती, वरोरा, बल्लारपूर या तालुक्यात सोयाबीनवर उंट अळीचा, तर मूल, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी व सिंदेवाही या तालुक्यांमध्ये धानावर लष्करी अळीने आक्रमण केले आहे. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी फवारणी सुरू केली असली तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने या अळींचा प्रादुर्भाव वाढतच जाणार असल्याची माहिती काथोडे यांनी दिली. पावसाअभावी कापसाची बोंडे पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची नितांत गरज असल्याची माहिती काथोडे यांनी पोटतिडकीने दिली. यावर्षी पाऊस झाला नाही तर या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट राहील, असेही ते म्हणाले.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

पावसाळ्यात कडक उन्हाळा
यावर्षी केवळ म्हणायला पावसाळा सुरू असला तरी प्रत्यक्षात उन्हाळाच सुरू आहे. सकाळी आठ वाजतापासूनच कडक उन्ह तापायला सुरुवात होत असल्यामुळे सर्वत्र उकाडा आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. घरी व कार्यालयात दिवसभर पंखे सुरू असतात. तरीही उकाडय़ापासून लोकांची सुटका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच या जिल्ह्य़ातील लोकही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरवासियांना तर पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखे दिवस काढावे लागत आहेत.