आरोग्यविषयक सूचनांचे पालन न केल्याचा आरोप 

वर्धा : नागपूर जिल्हय़ातून कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह येणारे पालकमंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांवर आरोग्यविषयक सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करीत खासदार रामदास तडस यांनी खळबळ उडवून दिली आहे.

वर्धेला भेट देताना पालकमंत्री सुनील केदार हे नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांसह थेट प्रवेश करतात, असा आरोप करीत खासदार तडस यांनी विविध दाखले देत प्रशासनाकडे याबाबत दखल घेण्याची मागणी केली. कुठल्याही व्यक्तीला जिल्हय़ात किंवा जिल्हय़ाबाहेर प्रवास करायचा असल्यास शासनाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेता प्रवेश करणे ही बाब बेकायदेशीर ठरते. पालकमंत्री म्हणून जिल्हय़ात येणाऱ्या केदारांना पूर्ण अधिकार आहे. परंतु ‘रेड झोन’ असणाऱ्या नागपूर जिल्हय़ातून त्यांच्यासोबत येणारा फ ौजफोटा चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे धोकाही उद्भवू शकतो. जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस विलगीकरणात पाठवल्या जाते. तसे पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांबाबत एकदा तरी झाले कां, असा सवाल खा. तडस यांनी उपस्थित केला. गुरुवारी वर्धा रेल्वेस्थानकावर श्रमिक विशेष रेल्वे गाडीला झेंडी दाखवण्याचा कर्यक्रम होता. यावेळीही पालकमंत्र्यांचे नागपुरातील कार्यकर्ते तसेच वर्धेतील काँग्रेस नेते यांनी नियमांचा फज्जा उडवला. तसे छायाचित्र समाज माध्यामवरही फि रले. कार्यकर्त्यांनी ‘मास्क’ लावले नव्हते. सामाजिक अंतराचा बोजवारा उडाला होता. नियमापेक्षा अधिक गर्दी जमली होती. जनतेला लग्न किंवा मृत्यूप्रसंगी ठराविक उपस्थितीचे बंधन आहे. येथे काहीच बंधन दिसले नाही. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी या घटनेचे साक्षीदार आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना नियम न पाळल्याबद्दल दंडुके बसतात. मास्क लावले नाही म्हणून पाचशे रुपये दंड आकारल्या जातो. वर्धा जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्येच राहावा म्हणून प्रशासन विविध नियमानिशी काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या बैठका आरोग्यविषयक सुरक्षेचे नियम पाळत असल्याचे जनता पाहते. तर दुसरीकडे पालकमंत्री व त्यांचा लवाजमा नियमांची पायमल्ली करीत आहे. याकडे लक्ष दय़ावे तसेच रेल्वेस्थानकावरील घटनेची दखल घेऊन प्रशासनाने व रेल्वे अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी खा. तडस यांनी आज केली.