राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचा लिलाव होत असल्याच्या घटनांची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

“लोकशाहीची क्रूर थट्टा, भीषण खून चाललेला आहे. त्यामुळे गावामध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी विकास निधीचं आकर्षण दाखवणं हे ठीक आहे. पण सरपंचपदाची बोली बोलायची आणि बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली हे स्वागतार्ह आहे.” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सध्या १४ हजार ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या माध्यमातून गावात गटबाजी किं वा तंटे वाढू नयेत, यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न के ला जात आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचा चक्क लिलाव करण्यात आल्याने राज्यभरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

सरपंचपदांच्या लिलावांची चौकशी

या गावात सरपंचपदासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख लाखांची बोली लावण्यात आल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेकांनी या घटनेचा निषेध करीत लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्यांवर कारवाईची मागणी के ली होती. याबाबत काहींनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्कार करीत अशा घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. त्याची गंभीर दखल घेत आयोगाने चौकशीचे आदेश दिल्याचे मदान यांनी सांगितले.