दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. “गेल्या काही वर्षांपासून बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम रेंगाळलं आहे. त्याला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, दोन वर्षात देखणं, दिमाखदार आणि अभिमान वाटावा असं स्मारक उभारणार,” अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची आता शंभर फूटांनी वाढवण्यात येणार आहे. आधी पुतळ्याची उंची अडीचशे फूट होती ती आता ३५० फूट करण्यात येणार आहे.

आणखी वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, “बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम रेंगाळल्यानं महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्याकडे लक्ष वेधलं होतं. धनंजय मुंडे आणि इतर काही नेत्यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करून हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकी घेण्याचा आग्रह धरला होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विषय बैठकीत घेतला. त्यात स्मारकाची उंचा वाढवण्यासह इतर निर्णयांना मंजूरी देण्यात आली. दोन वर्षात स्मारक पूर्ण करणार असून मी स्वतः अर्थमंत्री असल्यानं निधी कमी पडू देणार नाही. या स्मारकात संशोधनासह ग्रंथालय आणि इतर बऱ्याच सुविधा असणार आहेत. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल. कोणत्याही परवानग्या केंद्राकडे नाही राहिलेल्या. राज्य सरकारकडे राहिलेल्या सर्व परवानग्या आठ दिवसात पूर्ण करण्यात येतील. आजच्या बैठकीला एमएमआरडीएमचे अधिकारी उपस्थित होते,” असंही अजित पवार म्हणाले.