सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या परिस्थितीचा काही जणांकडून फायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत. “ग्राहकांच्या अशा परिस्थितीचा फायदा घेणारी लोकं म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारेच म्हणावे लागतील,” अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

“काही लोक अशा परिस्थितीतही स्वत:चा नफा कमवण्याचा प्रयत्न करतायत. अशा लोकांवर मोका लावला पाहिजे अशा मताचा मी आहे. परंतु काही गोष्टी नियमात बसून कराव्या लागतात. त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी पावलं उचलली जात आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं. “लोकांना सध्या परिस्थितीचं गांभीर्य कळू लागलं आहे आणि आपण असं काही करू नये अशी त्यांची मानसिकताही तयार होऊ लागली आहे,” असंही ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आणखी वाचा- करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा- अजित पवार

डॉक्टरांच्याही तक्रारी
“करोनामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. आम्ही त्यांना आवाहन आणि विनंतीही केली. करोनाव्यतिरिक्तही साथीचे आजार आहेत, वातावरण बदलल्यानंतरही काही आजार येतात. असं असताना त्यांच्यावर त्यांच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार झाले पाहिजेत, असं वाटतं. परंतु अनेकदा डॉक्टरांचीही तक्रार येते आमच्याकडे प्रोटेक्शन किट नाहीत, आम्हाला मास्क किंवा इतर गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु ते पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. त्यांची तक्रारदेखील योग्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. “राज्यात अनेक ठिकाणी मास्क तयार होतात. ते कारखाने कसे सुरू राहतील आणि त्या ठिकाणचा कामगार कसा कामावर पोहोचेल, सोशल डिस्टन्स कसा राखला जाईल, यावरही आम्ही लक्ष देत आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- Lockdown: अत्यावश्यक सेवेसाठीच्या पासचा गैरवापर; जप्तीचे पोलिसांना आदेश

केंद्राच्या मान्यतेची गरज
“राज्यात अनेक जण आपल्याकडे आजारासाठी औषध घेऊन येत आहे. त्याच्या चाचणीसाठी लागणाऱ्या सुविधाही असल्याचं सांगत आहेत. अनेक ठिकाणी संशोधनही सुरू आहे. परंतु आम्हाला केंद्र सरकारच्या सुचनांचंही पालन करावं लागतं. केंद्र सरकारची एक टीम आहे आणि ती टीम अंतिम शिक्का मारत नाही तोपर्यंत ते वापरण्याची परवानगी नाही. ते वापरताना जर कोणाच्याही जीवाचं बरं वाईट होता कामा नये, याचीही काळजी घेतली पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.