News Flash

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बळीसंख्येचा आढावा घ्या, मुख्यमंत्र्यांना फडणवीस यांचं पत्र

करोनाचा लढा आकडेवारी केंद्रीत नको

संग्रहित

मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. पनवेलमध्ये संसर्गाचा दर ४५ टक्क्यांवर, भिवंडीमध्ये ४८ टक्के, मीरा भाईंदरमध्ये ४३ टक्के इतके संसर्गाचे प्रमाण आहे. एकीकडे करोना चाचण्या नियंत्रित केल्या जात आहेत, तर दुसरीकडे बळीसंख्येत जुने दडविलेले मृत्यू रोज अधिक होत आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा समग्र आढावा घ्यावा आणि त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत  २४ जून २०२० पर्यंत २,९९,३६९ इतक्या चाचण्या झाल्या होत्या, तर रूग्णसंख्या ६९,५२८ इतकी होती. चाचण्यांच्या संख्येत संसर्गाचे प्रमाण हे २३.२२ टक्के इतके होते. यातील १ ते २३ जून या कालखंडात ९७, ८७२ चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून २९,०१७ रूग्ण आढळले, हा दर २९.६५ टक्के इतका आहे.  २४ जून पर्यंत देशात ७३,५२,९११ चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी ४,७३,१०५ रूग्ण आढळून आले. संपूर्ण देशात संसर्गाचा दर ६.४३ टक्के होता. २४ जून रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक एका दिवशीच्या चाचण्या देशात याचदिवशी करण्यात आल्या. त्या २,१५,१९५ इतक्या होत्या. त्यातून १६,९२२ रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण ७.८६ टक्के होते.

ठाण्यात आतापर्यंत ३७,४०९ चाचण्या झाल्या आणि ११,२२० रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण २९.९४ टक्के आहे. नवी मुंबईत आतापर्यंत १७,६०४ चाचण्या झाल्या, ६४०७ रूग्ण आढळून आले. संसर्गाचे प्रमाण ३६.४० टक्के, पनवेलमध्ये ३५०० चाचण्या, १५९९ रूग्ण, ४५.६९ टक्के संसर्ग, कल्याण-डोंबिवलीत १२,१८६ चाचण्या, ४८४३ रूग्ण, संसर्ग ३९.७४ टक्के, मीरा भाईंदरमध्ये ६३५१ चाचण्या, २७३८ रूग्ण, संसर्ग ४३.११ टक्के, भिवंडी निजामपूर: २८९८ चाचण्या, १४०७ रूग्ण, संसर्ग ४८.५५ टक्के टक्के, पालघर, वसई, विरार : १९,६९२ चाचण्या, ४०२८ रूग्ण, संसर्ग २०.४६ टक्के अशी स्थिती आहे.

करोनाविरोधातील लढा हा आकडेवारी केंद्रीत नको, तर करोनाकेंद्रीत हवा, असे आपण सातत्याने सांगतो आहोत. पण, तसे होताना दिसून येत नाही. कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित केल्या जात आहेत, असे सांगताना त्यांनी यासंदर्भातील काही दाखलेही या पत्रात दिले आहेत. बळींची संख्या, संपूर्ण राज्याची फेरपडताळणी पूर्ण केल्यानंतरही दररोज जुने मृत्यू अधिक केले जाणे, यावर सुद्धा सविस्तरपणे त्यांनी पत्रात लिहिले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा मृतदेहांची करोना चाचणी बंद करण्याचा आदेश 19 जून रोजी काढण्यात आला. तो रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. वारंवारच्या आदेशांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. कोरोना पॉझिटिव्ह चाचणीचा अहवाल द्यायचा नाही, हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला, म्हणून बरे झाले. पण, मुंबईत अनेक रूग्ण पळून जातात, ही सुद्धा गंभीर बाब आहे. शासन, प्रशासन म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये, म्हणून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरजही त्यांनी या सविस्तर पत्रातून नमूद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 9:30 pm

Web Title: devendra fadanvis letter to cm uddhav thackeray about corona patients and deaths scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ प्रकल्पातर्फे  हायजेनिक मटण शॉप सुरू
2 महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २४ करोना रुग्णांची भर, १७५ मृत्यू
3 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X