राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले असून, पंतप्रधान मोदीनींही करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची तक्रार मोदींकडे केली होती. या तक्रारीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत ठाकरे यांना इशारा दिला आहे.

ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामांचा समाचार घेतला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले,”मराठा आरक्षणाचा मोठा घोळ केला आहे. सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाही. विद्यार्थ्याचे अतोनात हाल झाले आहेत. आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केले होते,” असं फडणवीस म्हणाले.

“आमच्या कितीही तक्रारी केल्या, तरी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करीत राहू, कारण हे सरकार नाकर्ते आहे आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जागे करणे, हे आमचे काम आहे. कोणत्याही घटकाचे समाधान हे सरकार करू शकलेले नाही. सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये आपसात कोणताही समन्वय नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी,” असा टोला फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला.

“स्थगिती पलिकडे या सरकारकडे दाखवण्यासारखे काही नाही. आरे कारशेडवर स्थगिती हा निर्णय मुंबईकरांवर अन्याय करणारा आहे. देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. रस्त्यावर मृत्यू होताना बघितले. बाथरूममध्ये १५ दिवस मृतदेह पडून होता. इतके भीषण वास्तव असताना हे म्हणतात करोनाची स्थिती उत्तम हाताळली,” असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.