11 August 2020

News Flash

“मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस लोकांना माहित झाले”; ‘त्या’ प्रश्नावरुन पवारांचा टोला

फडणवीस यांनी केलेल्या आरोपासंदर्भातील प्रश्नावरुन पवारांचा टोला

महाराष्ट्रातील २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते हे प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना पवार यांनी ‘त्यावेळी ते (फडणवीस) कुठे होते ठाऊक नाही,’ असं म्हणत २०१४ मध्ये फडणवीस यांना फारसं राजकीय महत्व नव्हतं असं सूचित केलं आहे. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी २०१४ मधील राजकीय घडामोडीसंदर्भात वक्तव्य केलं.

“देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप तुमच्यावर केले. त्यांच्या सांगण्यानुसार हे गौप्यस्फोट आहेत. त्यातील पहिला आरोप त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केला की २०१४ साली तुम्हाला भाजपाबरोबर सरकार बनवायचं होतं. तुम्ही आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करत होते असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं,” असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. या वेळेस पवारांनी फडणवीस यांच्याकडे तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता असणारं नेतृत्व नव्हतं असं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

फडणवीस यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीला भाजपासोबत सत्ता स्थापन केल्याचं सांगितल्याचं माझ्याही वाचनात आलं असं पवार म्हणाले. यासंदर्भात बोलताना त्यांनी त्यावेळी फडणवीस हे फार महत्वाचे नेते नव्हते असंही अप्रत्यक्षपणे म्हणटलं. “त्यांनी असं सांगितल्याचं माझ्याही वाचनात आलं. पण गंमत अशी आहे की त्यावेळी ते कुठे होते माहीत नाही. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यांचं काय स्थान होतं हे ही माहित नाही. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहित झाले. त्याआधी विरोधी पक्षातील जागृत आमदार म्हणून त्यांचा लौकीक होता. पण संबंध राज्यातल्या किंवा देशातल्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही,” असा टोला पवारांनी फडणवीस यांना लगावला आहे.

नक्की वाचा >> “मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगून आलो की…”; राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात पवारांचा खुलासा

पुढे बोलताना पवारांनी “२०१४ साली भाजपाला बाहेर पाठिंबा देण्याचा निर्णय़ ही केवळ राजकीय चाल होती. शिवसेनेला भाजपापासून दूर ठेवण्यासाठी केलेला तो प्रयत्न होता,” असंही स्पष्ट केलं.  फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत पवारांनी, “फडणवीस सांगतात हे मला अजिबात मान्य नाही. पण आम्ही भाजपा आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढावं यासाठी मी जाणीवपूर्व पावलं टाकली हे कबूल करतो,” असंही म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 9:09 am

Web Title: devendra fadnavis was not the part of decision making process post 2014 state election says sharad pawar scsg 91
Next Stories
1 Video: एक शरद, सगळे गारद…!; येथे पाहा मुलाखतीचा शेवटचा भाग
2 नेत्यांच्या ३७ साखर कारखान्यांना सरकारचे अभय?
3 ओबीसींचा टक्का वाढविण्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला कात्री?
Just Now!
X