News Flash

हा पंकजा मुंडेंच्या ज्ञानाचा दोष; धनंजय मुंडेंचा पलटवार

लाभार्थ्यांपेक्षा कंत्राटदारांचे हित नजरेसमोर ठेवून योजना आखल्याने सरकारी योजना अयशस्वी होत आहेत

लाभार्थ्यांपेक्षा कंत्राटदारांचे हित नजरेसमोर ठेवून योजना आखल्याने सरकारी योजना अयशस्वी होत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. “राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या सॅनिटरी नॅपकीन, चिक्की पुरवठ्यासारख्या योजना केवळ भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरल्या किंवा मागे घ्याव्या लागल्या आहेत. नवजात अर्भकांसाठीची “बेबी केअर किट’ योजनाही त्याच मार्गाने चालल्याने, बालकांच्या आरोग्याच्या हितासाठी त्यातल्या ‘त्रुटी’ मी लक्षात आणून दिल्या. ही योजना पूर्ण अभ्यासाअंती व आरोग्य विभागामार्फत राबवावी, अशी सूचना मी केली होती. त्यात महिला व बालकल्याण मंत्र्यांना राग येण्याचं कारण काय?,” अशा शब्दांत मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मूल जन्माला येण्याआधी ते ‘नकटं’ आहे हे सांगण्याची विरोधी पक्षनेत्यांना सवय जडली आहे, अशी टिका महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. यास उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, “जन्माला येणारं मूल नकटं आहे की नाही हे कळू शकत नाही. परंतु मूलामध्ये शारिरिक व्यंग असेल तर तज्ञ डॉक्टर मूल जन्माला येण्याआधी ते सांगू शकतात. तज्ञांनी वेळीच दिलेल्या सल्ल्याने उपचार घेता येतात. त्याच भूमिकेतून बेबी केअर किट खरेदी योजनेत कोणत्या त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, हे जबाबदार विरोधी पक्षनेत्याच्या नात्याने मी वेळीच सरकारच्या लक्षात आणून दिले.”

“मंत्रीमहोदयांनी माझी सूचना सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारायला हवी होती, परंतु त्या रागावल्या. त्यांच्या योजना अपयशी होणार हे मला आधी कळतं आणि महिला व बालविकासमंत्र्यांना योजना अयशस्वी झाल्याशिवाय कळत नाही, हा दोष मंत्रीमहोदयांच्या ज्ञानाचा आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. “बेबी केअर किटखरेदी योजनेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मंत्रीमहोदयांनी कुणाकडून तरी नीट समजून घेण्याची गरज आहे. बेबी केअर किट खरेदीचे कंत्राट निघाल्याचे मी म्हटलेले नाही. कंत्राट काढण्यापूर्वीच या योजनेतील त्रूटी दूर होण्यासाठी मी मुख्ममंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे, मुंडे म्हणाले.

“ही योजना शेजारच्या राज्यात यशस्वी झाली तशी आपल्याकडेही होऊ शकते, परंतु ती योग्य पद्धतीने, योग्य यंत्रणेमार्फत राबवली पाहिजे, तसंच राबवण्यामागचा हेतू प्रामाणिक हवा. योजना कोण आणि कशी राबवतं यावरंच योजनेचं यशापयश अवलंबून असतं. बेबी केअर किट खरेदी योजना यशस्वी होणं आवश्यक आहे, त्यासाठी योजनेचा पूर्वाभ्यास या क्षेत्रातल्या तज्ञांकडून व्हावा तसंच योजना आरोग्य विभागामार्फत राबवण्यात यावी,” धनंजय मुंडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 5:28 pm

Web Title: dhananjay munde criticize pankaja munde
Next Stories
1 शिवसेनेची अवस्था देताही येत नाही आणि जाताही येत नाही – धनंजय मुंडे
2 अक्कलकुवा येथे चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याला घेराव
3 बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन
Just Now!
X