विदेशात जाऊन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन या संदर्भातली माहिती दिली. या निर्णयामुळे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शाखेतील पदवी आहे त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल असा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. हा निर्णय धनंजय मुंडे यांनी मागे घेतला आहे.

;

काय म्हटलंय धनंजय मुंडे यांनी?

परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल. तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. वयोमर्यादा पदव्युत्तर साठी ३५ वर्षे व पीएचडी साठी ४० वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. १४ ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल.

चालू शैक्षणिक वर्षासाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत, १४ ऑगस्ट पर्यंत असलेली त्याची मुदतही वाढविण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज दाखल करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई – मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारावेत असेही धनंजय मुंडे यांनी आयुक्तालयास निर्देशित केले आहे.

पदवी संदर्भातील अडसर दूर करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.