20 November 2017

News Flash

धुळे आयुक्तांकडून शासनाची फसवणूक!

भाजप नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वार्ताहर, धुळे | Updated: May 19, 2017 1:24 AM

भाजप नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

धुळेकरांना सुविधा मिळाव्या म्हणून आंदोलन करणाऱ्या ठराविक नगरसेवकांना सूडबुध्दीने भोगवटा प्रमाणपत्राची नोटीस बजावून आयुक्त संगीता धायगुडे मुस्कटदाबी करीत असून सदरचे प्रमाणपत्र सादर न केल्यास नगरसेवकपद रद्द करण्याची धमकी देत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी केला आहे.

शासनाला कर वसुलीची खोटी आकडेवारी पाठवून पुरस्कार प्राप्त करुन घेत शासनाचीच फसवणूक आयुक्त व मनपा प्रशासनाने केली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्याची मागणीही चौधरी यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली आहे.

लोकप्रतिनिधींना लोकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनांचा वापर करावा लागतो. ११ मे रोजी  नागरिकांनी प्रभाग क्रमांक सातमधील गरुड कॉलनी, एस. टी कॉलनी येथे गणपती पुलाजवळील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांभोवती रांगोळी काढून आंदोलन केले होते. त्याच दिवशी प्रभागातील पाण्याच्या समस्येकरीता तीन नगरसेवक साबीर अली, अमीन पटेल, फातमाबी शेख गुलाब यांनी आंदोलन केले.

आंदोलन करणाऱ्या आम्हा चार नगरसेवकांना सूडबुद्धीने बांधकाम व भोगवाटा पत्राची नोटीस देऊन नगरसेवकपद रद्द करण्याची धमकी देण्यात आली आहे. धुळे मनपात ७५ नगरसेवक असतांना फक्त चार नगरसेवकांनाच ही नोटीस का, असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

आयुक्तांच्या म्हणण्यानुसार शहरात ९२ टक्के कर वसुली झाली आहे. त्यांनी शासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारही प्राप्त करून घेतला आहे. प्रत्यक्षात मनपाची कररूप वसुली फक्त ६० टक्के असताना शासनाला वसुली अधिक दाखवून आयुक्तांनी शासनाची गंभीर फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चौधरी यांनी निवेदनात केली आहे.

भोगवटा प्रमाणपत्राचे भूत

यापूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नामदेव भोसले यांनी अशाच पध्दतीने काही नगरसेवकांना बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी भोसले विरुध्द नगरसेवक असा संघर्ष निर्माण झाला होता. त्यांच्या बदलीनंतर भोगवटा प्रमाणपत्राचे हे भूत बाटलीबंद झाले होते. परंतु, आता आयुक्त धायगुडे यांनी बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्राच्या आडून आंदोलनकर्त्यां नगरसेवकांना लक्ष केल्याने भोगवटा प्रमाणपत्राचे भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आल्याची चर्चा सुरु  आहे.

First Published on May 19, 2017 1:24 am

Web Title: dhule commissioner fraud with government