लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाऊनही कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील नेतृत्वाची तोंडे चार दिशांना आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाही त्यांच्यातील गटबाजीने आणखीनच उसळी घेतली आहे. नेतृत्वातील सुंदोपसुंदी पाहून तळातील काँग्रेस कार्यकर्ताही संभ्रमित झाला आहे. गुरुवारी सद्भावना दौडच्या निमित्ताने एकत्रित येणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाकडून पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्याची भीमगर्जना होईल, पण दुसऱ्या दिवसापासून मात्र ये रे माझ्या मागल्या.. प्रमाणे गटबाजीचा नवा अध्याय पूर्वीच्याच जोमाने सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वास राज्याचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून काही उपेदशामृत पाजले जाणार का हे लक्षवेधी बनले आहे.
एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय होईपर्यंत काँग्रेसचा तिरंगा डौलाने फडकत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडून दिग्गज नेत्यांनी हाती घडय़ाळ बांधणे पसंत केले. उरल्यासुरल्यांनी काँग्रेसच्या बळकटीकरणाचे प्रयत्न केले. जिल्ह्यातील काँग्रेस भक्कम व्हावी यासाठी राज्यातील नेतृत्वानेही गेल्या पंधरा वर्षांत जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, सतेज पाटील यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा दिली. तरीही काँग्रेसची ताकद म्हणावी तितकी वाढली नाही. उलट लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये या तिन्ही माजी मंत्र्यांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनाही पराभूत व्हावे लागले. ना केंद्रात कोणी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी राहिला, ना कोणी राज्यात.
दारुण पराभवानंतरही काँग्रेस पक्षामध्ये काही सुधारणा होईल असे वाटत होते. पण गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता काँग्रेसची वाटचाल निराशाजनक परिस्थितीकडून अतिनिराशाजनक परिस्थितीकडे सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फटका बसलेल्या काँग्रेसची गटबाजी पुढेही सुरूच राहिली. अलीकडेच पार पडलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत या गटबाजीचे ओंगळवाणे दर्शन घडले. गोकुळ दूध संघात जिल्हाध्यक्ष पाटील, आमदार महादेवराव महाडिक हे एकीकडे असताना त्यांना सतेज पाटील यांनी कडवे आव्हान दिल्याने कटुता निर्माण झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांच्यातील गटबाजीने उचल खाल्ल्याने दोघांतील अंतर आणखीनच वाढले. ते इतके की सद्भावना दौड कार्यक्रमास जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसजनांना निमंत्रित करताना आवाडे यांचा निमंत्रणपत्रिकेत नामोल्लेख करण्याचे टाळले. मुळात करवीर, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांत काँग्रेसची धुगधुगी जाणवते. इतर तालुक्यांत काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सत्तेत आलेल्या भाजपने ताराराणी आघाडीसोबत तर शिवसेनेने स्वबळावर ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार करून नियोजनास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जनसुराज्य पक्षाशी हातमिळवणी करून पुढचे पाऊल टाकले आहे. पण काँग्रेस पक्षात मात्र गटबाजीचे लोण कायम राहिले आहे. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमोरच पक्षांतर्गत गटबाजीचे गढूळ पाणी आणखीन ढवळले गेले. आमदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर शरसंधान केले. तर पाटील यांनी पलटवार करताना महाडिकांच्या पक्षशिस्तीचे वाभाडे काढले. महाडिकांचे सेनापती व सनिक ताराराणी आघाडीत दाखल झाले असताना आता उमेदवारांचे तिकीट वाटप तेच ठरवणार असल्याने दुसऱ्या गटातून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती युवराज मालोजीराजे हे अजूनही शांत शांतच आहेत. कोणत्याच नेत्यांचा कोणाशी पायपोस नसल्याने आणि संवादाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसची मरगळ निघून जाईल अशी शक्यता दिसत नाही.