पानसरे उभयतांवरील हल्ल्याचा शोध घेण्यात उमा पानसरे यांचा जबाब व त्यांच्याकडून रेखाचित्राची माहितीवर पोलिसांचा भर होता. पण उमा पानसरे यांनी त्यांना दाखवलेली छायाचित्रे व रेखाचित्रे प्रत्यक्ष हल्लेखोरांशी जुळत नसल्याचे सांगितले आहे. पानसरे यांच्या जबाबावर पोलीस तपास विसंबून होता. पण आता हाही मार्ग खडतर बनल्याने तपास नेमक्या कोणत्या बाजूने करायचा याची नव्याने व्यूहरचना करावी लागणार आहे.
ज्येष्ठ कामगार नेते गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार असणाऱ्या उमा पानसरे यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न तपासी अधिकारी अपर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केला. या वेळी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आलेले रेखाचित्र व महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्रे दाखविण्यात आली. अनेक रेखाचित्रे व छायाचित्रे दाखवल्यानंतरही उमा पानसरे यांनी त्यापकी कोणाचाही चेहरा हल्लेखोरांशी मिळता जुळता नसल्याचे सांगण्यात आल्याचे समजते.
१६ फेब्रुवारी रोजी गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरानजीक अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून हल्ला चढविला होता. गोिवद पानसरे व उमा पानसरे यांना उपचारासाठी तत्काळ नजीकच्या अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी गोिवद पानसरे यांना मुंबई येथील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र उमा पानसरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना दवाखान्यातून घरी जाण्यास परवानगी दिली. ते आता घरी येणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
दरम्यान या प्रकरणाचे तपासी अधिकारी अंकित गोयल यांनी उमा पानसरे यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी गोयल यांनी उमा पानसरे यांच्याशी ३० मिनिटे संवाद साधला. पानसरे यांना पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तयार केलेली रेखाचित्रे दाखविली तसेच गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकसह सीमा भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची छायाचित्रे दाखविली गेली.