25 November 2020

News Flash

‘टोसिलीझुमॅब’ इंजेक्शनसाठी तगादा लावणाऱ्या डॉक्टरला सेवेतून काढलं

लोकसत्ताच्या वृत्ताची दखल; विविध शासकीय विभागांकडून या प्रकरणी चौकशी सुरू

संग्रहीत छायाचित्र

बोईसर येथील टिमा रुग्णालयात ‘टोसिलीझुमॅब’ इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना काळ्याबाजारातून उपलब्ध करून देणाऱ्या, डॉक्टरला सेवे दरम्यान कामाकडे दुर्लक्ष केल्याचा व रुग्णांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत, रुग्णालय सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. लोकसत्ताच्या वृत्ताची शासकीय विभागाने दखल घेतली असून, या प्रकरणाची चौकशी आता विविध शासकीय विभागांकडून सुरू झाली आहे. पालघरमधील वैद्यकीय क्षेत्रात देखील या वृत्ताने खळबळ माजली आहे.

टोसिलीझुमॅब हे इंजेक्शन प्रभावी नाही, अशा सूचना शासनासह ती पुरवठा करणाऱ्या कंपनीने दिल्यानंतरही बोईसर येथे विनामूल्य सेवा देण्याचा दावा करणाऱ्या, एका खासगी फिजीशियन डॉक्टरमार्फत अत्यवस्थ रुग्णांना टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा तगादा लावण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्यासह प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी देखील या डॉक्टरला अशाप्रकारे तगादा न लावण्याबाबत सूचित केले होते. मात्र त्यानंतरही आपला वैद्यकीय सराव योग्य असल्याचे गृहीते मांडून ते या इंजेक्शनसाठी रुग्णांकडे तगादा लावत असत असे तक्रारींवरून स्पष्ट होत आहे.

टीमा रुग्णालयात दाखल असलेल्या एका अत्यवस्थ रुग्णांकडे या डॉक्टरने पुन्हा एकदा २९ ऑगस्ट रोजी यासाठीच तगादा लावला होता. या इंजेक्शनचा संपूर्ण महाराष्ट्रात तुटवडा असताना, डॉक्टरने मात्र ते इंजेक्शन काळ्याबाजारातून रुग्णाच्या नातेवाईकाला उपलब्ध करून दिले व ते ७० हजार रुपयांना नगदी खरेदी केले गेले.

आश्चर्याची बाब म्हणजे या इंजेक्शनचा तगादा लावल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी एका तासात हे इंजेक्शन काळा बाजारातून उपलब्ध करून दिले. तसेच, ते संबंधित अत्यवस्थ रुग्णाला टोचल्यानंतरही त्या रुग्णांचे प्राण वाचले नाहीत.  सोमवारी संध्याकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित इंजेक्शन देताना मार्गदर्शक सूचनांनुसार त्याआधी करण्यात येणाऱ्या रक्त तपासणी आदी तपासण्या केल्या गेल्या होत्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, आपल्यावर सोपविलेल्या कामाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी व रुग्णांची दिशाभूल केल्याप्रकरणी या डॉक्टरची टीमा हॉस्पिटलमधील सेवा समाप्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसत्तामधील वृत्ताची दखल घेऊन अन्न, औषध व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पालघरमध्ये चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

या डॉक्टरची टीमा रुग्णालयातील सेवा काढून घेतल्यानंतर या डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाला दुसऱ्या क्रमांकावरून बोलावून घेतले. ‘अभी मुझे तो निकाल दिया गया है, अब आपके पिताजी को कौन देखेगा’ असे या डॉक्टरने रुग्णाच्या मुलाला बोलून दाखविले. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यानंतर काही वेळेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:43 pm

Web Title: dismissal order for a doctor who insists on toxilizumab injections msr 87
Next Stories
1 यंदा ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा; करोनामुळे बाप्पाला साधेपणाने निरोप!
2 “वहां कौन था? काँग्रेस थी, भाजपा थी? रसोडे में मोदीजी थे”
3 सातारा : मुलांना लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघांचा खून
Just Now!
X