पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. संमेलनासाठी जाहीर केलेल्या अनुदानाचा निधी उपलब्ध करून देण्यावरून महापौर प्रा. सुशीला आबुटे व भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यात शाब्दिक जुगलबंदी झाली.
गेल्या चार दिवसांपासून हरिभाई देवकरण प्रशाला प्रांगण (बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी), हुतात्मा स्मृतिमंदिर (शाहू-फुले-आंबेडकर नाट्यनगरी) व डॉ. निर्मलकुमार फडकुले नाट्यसंकुल (बालकवी ठोंबरे नाट्यनगरी) अशा तीन ठिकाणी संमेलनात विविध भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. सोलापूरकरांनी हे बालनाट्य अक्षरश: डोक्यावर घेतले होते. परंतु संमेलनासाठी आíथक निधीची कमतरता पडली. यात संमेलनाचे कार्याध्यक्ष विजय साळुंखे हे अक्षरश तोंडघशी पडले. सोलापूर महापालिकेने २५ लाखांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. परंतु शेवटच्या क्षणी अनुदानाचा निधी देण्यासाठी राज्य शासनाच्या मान्यतेचे कारण पुढे करीत अनुदान देण्यास नकार दिला. त्याचे पडसाद संमेलनाच्या समारोपात पडले. राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी समारोपप्रसंगी हजेरी लावून, महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीसाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. आपण विरोधकात असल्यामुळे आपले वजन कमी पडणार असल्याची जाणीव करून देत मोहिते-पाटील यांनी निधीचा चेंडू आमदार सुभाष देशमुख यांच्या दिशेने टाकला. महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी सोलापुरात बालरंगभूमीसाठी बालभवन उभारण्याकरिता महापालिकेच्या मालकीचा भूखंड उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. महापालिकेने जाहीर केलेला निधी उपलब्ध होण्यासाठी शासन मान्यता घेण्याकरिता आमदार देशमुख यांनी पुढाकार घ्यावा. आपण जर या क्षणी आमदार असते तर लगेचच आमदार निधी या बालनाट्य संमेलनासाठी नक्कीच उपलब्ध करून दिला असता, असा टोला लगावला. त्यावर प्रतिवाद करीत आमदार देशमुख यांनी महापौरांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. हजार कोटींपेक्षा अधिक अर्थसंकल्प मांडणाऱ्या सोलापूर महापालिका स्वत पुढाकार का घेत नाही, असा सवाल केला. महापालिकेने बालभवनासाठी भूखंड शोधायला नाट्य परिषदेला सांगण्यापेक्षा स्वत भूखंड शोधावा आणि तो नाट्य परिषदेला द्यावा, असे सुनावले. ही जुगलबंदी चांगलीच रंगली. तेव्हा संमेलनास खास उपस्थित राहिलेले कमलाकर सोनटक्के यांनी, हा वाद बहीण-भावामधील असून त्यातून चांगलेच निष्पन्न होईल, असा आशावाद व्यक्त केला.
या वेळी अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, ९६ व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाधर गवाणकर आदींनी आपल्या मनोगतातून बालनाट्य संमेलनासाठी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सोलापूरकरांना धन्यवाद दिले.