उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्यावे – दिवाकर रावते

छत्रपती शिवरायांच्या घराण्याचा वारस लोकसभेतून बेवारस करण्याच्या हालचाली सध्या साताऱ्यात सुरू आहेत. याला विरोध करत सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपतींचे वारस असलेले खासदार उदयनराजे भोसले यांना सर्व राजकीय पक्षांनी बिनविरोध निवडून दिले पाहिजे, असे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सातारा येथे व्यक्त केले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षबांधणीसाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रावते बोलत होते. रावते यांची नुकतीच शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संपर्क नेतेपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर ते प्रथमच सातारा येथे आले होते.

रावते म्हणाले, की उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारस आहेत. त्यांना खरेतर सर्वच राजकीय पक्षांनी बिनविरोध दिल्लीला पाठवायला पाहिजे. मात्र त्यांना विरोध करण्याचा व अडचणीत आणण्याचा कुटील डाव सध्या सुरू आहे. छत्रपतींचे वारस म्हणून त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार देऊ नये. आज जरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले, तरी त्यांना सध्या साताऱ्यातच विरोध केला जात आहे. छत्रपतींचा हा वारस बेवारस करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण असे कधीही होणार नाही. छत्रपती शिवरायांच्या घराण्याला आपण जर मानत असू, तर त्यांचा वारस दिल्लीत गेलाच पाहिजे.

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत रावते यांनी उदयनराजे भोसलेंविषयी केलेल्या वक्तव्याने शिवसैनिकही अचंबित झाले. त्यांच्या या वक्तव्यामागे आगामी राजकीय गणिते तर दडली नाहीत ना अशी चर्चा यानंतर सुरू झाली.