06 August 2020

News Flash

दिवाळी अंकांचे स्वागत..टॉनिक

यंदाचा ‘टॉनिक’चा वार्षिक दिवाळी अंक ज्ञानरंजक झाला आहे.

टॉनिक
यंदाचा ‘टॉनिक’चा वार्षिक दिवाळी अंक ज्ञानरंजक झाला आहे. यावर्षी ‘जपान विशेषांक’ काढण्यात आला आहे. डॉ. विजया वाड यांची ‘फुजीची गोष्ट’, डॉ. मंगला जयंत नारळीकर यांची ‘साकुरा’, ‘जगात तळपे असा देश’ हे जपानमधील अनुभव, गिरिजा कीर यांची ‘फुलं फुलवणारा म्हातारा’ ही कथा, जोसेफ तुस्कानो यांचे ‘जपानमध्ये आगळेवेगळे सण’ हे लेख वाचनीय झाले आहेत. कथाकृष्ण मानकर यांचा ‘वेशभूषा’ लेख, शकुंतला फडणीस यांचे ‘जपानी अनुभव’, मालविका देखणे यांची ‘ठेंगू आणि हुशार शेतकरी’ ही कथा, धुंडीराज कसळेकर यांची ‘हृदयाची श्रीमंती’, मंदाकिनी भट यांचे ‘जपानमधील मानाचे मानकरी’ मानकरकाका यांचे ‘माझं एवढं ऐकाच’ हे सदर मुलांना बिकट परिस्थितीतून उभे राहण्याची प्रेरणा देते. बबन धनावडे यांची ‘जपानची सैर’ अरुण म्हात्रे यांची ‘जपानी पंख्याचा किती गोड वारा’, अनंत विचारे यांची ‘पुन्हा ताठ हा उभा जपान’ यांच्या कविता मनात रुळतात.
संपादक : चित्रकार मानकरकाका
किंमत : १०० रुपये.

खेळ
शुद्ध साहित्यिक आणि कलाविचारी नियतकालिक म्हणून ओळख असलेला ‘खेळ’चा यंदाचा दिवाळी अंक मुलाखती, लेख, कविता आणि कादंबरी अंश या विविध साहित्य छटांनी परिपूर्ण आहे. अमरजीत चंदन यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सोहन कादरी यांची घेतलेली मुलाखत या अंकात देण्यात आली आहे. कवयित्री मलिका शेख यांची सुप्रिया आवारे यांनी रंगविलेली मुलाखत वाचकांसमोर कविता निर्मितीचे रहस्य खुले करणारी आहे.
दीपक घारे, प्रकाश केजकर, प्रभाकर बागल आणि संदीप कांबळे यांचे लेख वाचकांच्या वैचारिकतेत भर घालणारे आहेत. नागनाथ कोत्तापल्ले, विवेक काटीकर, दीपक बोरगावे, विनय पाटील, फेलिक्स डिसोजा यांच्या कविता विविध विषयांना प्रभावीपणे हाताळणाऱ्या आहेत. पंकज भोसले यांनी लिहिलेला ‘साइड हीरो आणि साइड हीरोइन यांची रोमॅण्टिक गोष्ट’ हा कादंबरीचा अंश वाचकांना खिळवून ठेवणारा आहे.
संपादक : मंगेश काळे
किंमत : १०० रुपये.

विश्वसंकेत
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांच्यावर लिहिलेले लेख हे ‘विश्वसंकेत’ या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे. विजय रणदिवे यांनी डॉ. कलाम यांच्या देदीप्यमान कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. शिक्षण प्रसारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हा विजया शिरोळे यांचा लेख आहे. त्याचप्रमाणे ‘ग्रामसमृद्धीची प्रकाशवाट’ हा सुधीर कोर्टीकर यांचा लेख ग्रामविकासाचा आढावा घेणारा आहे.
संपादक : जयश्री काळे
किंमत : १५० रुपये.

आगरी दर्पण
‘आगरी दर्पण’च्या यंदाच्या २१ व्या अंकात ‘दगडापेक्षा वीट मऊ आहे का?’ तसेच जगणं सुसह्य़ होतंय का’ या दोन परिसंवादात सामान्य माणसाच्या भावना विचारवंत व ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केल्या आहेत. या परिसंवादात जयदेव डोळे, अनंत गाडगीळ, आ. पाशा पटेल, सुभाष वारे, अतुल भातखळकर, जे. एफ. पाटील यांनी भाग घेतला आहे. तसेच दुसऱ्या परिसंवादात कुमार सप्तर्षी, रत्नाकर महाजन, अशोक चौसाळकर, हेमंत देसाई, प्रमोद मुजुमदार, भागा वरखडे यांनी आपली मते नोंदविली आहेत. याशिवाय अरुण म्हात्रे यांचा ‘या भाने.. या भूमीला ‘दान’ द्यावे, हा कवी ना. धों महानोर यांच्यावरील लेख उत्तम आहे.
संपादक : दीपक रा. म्हात्रे
किंमत : १२० रुपये.

साप्ताहिक अ‍ॅमॅच्युअर
हौसेखातर निघणाऱ्या अंकांमध्ये विस्मरणीय अंकांची संख्या अधिक असते. नावातून प्रांजळपणा प्रगट करणाऱ्या इचलकरंजी येथील या अंकाबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. एकीकडे बऱ्याच बडय़ा दिवाळी अंकांना हॉलीवूडच्या आरंभकाळातील सम्राज्ञी इनग्रीड बर्गमनच्या जन्मशताब्दी वर्षांचा विसर पडला असताना, या अंकाने त्यावर देखणी मुखपृष्ठकथाच रचली आहे. इचलकरंजी येथील चाळीस वर्षांपूर्वीच्या साहित्य संमेलनाची आठवण असो की ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्यावरील माँटुकला लेख असो. लेखनऊर्मीतून या अंकातील साहित्य सजलेले आहे. विश्वंभर तेरेदेसाई यांनी जॉन पर्किन्स या लेखकाच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ‍ॅन इकॉनॉमिक हिट मॅन’ या पुस्तकाचे उत्तम विश्लेषण केले आहे. चीनच्या नोबेल विजेत्या योऊयू तू यांच्या संशोधनावर प्रकाश टाकणारा प्राजक्ता सांगले यांचा लेख. व्ही. के. कृष्णमेनन यांच्या व्यक्तिविशेषाला विशद करणारा आहे.
संपादक : रविकिरण चौगुले
किंमत : १०० रुपये.
वाणिज्य विश्व
दि पूना र्मचट्स चेंबर या संस्थेचे मुखपत्र सलेल्या व्यापारी जगतातील ख्यातनाम ‘वाणिज्य विश्व’ या मासिकाचा दीपावली विशेषांक विविध विषयांनी समृद्ध आहे. या अंकात प्रामुख्याने व्यापार विषयक साहित्यांचा समावेश असल्यामुळे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी, तसेच व्यापार विश्वातील घडामोडी जाणून घेणाऱ्यांकरिता हा अंक उपयुक्त ठरावा. बाजारपेठांचा आढावा या विशेष सदरात जीवनावश्यक धान्ये, कडधान्ये, कापड, सराफ, मिठाई, शेअर तसेच बाजारातील घडामोडींचा अभ्यासपूर्ण आढावा विनायक कुलकर्णी, सुभाष किवडे आणि राजा पाटील यांनी सादर केला आहे.
संपादक : विजय मुथा
किंमत : १०० रु.

साभार पोच..
श्रावणी (संपादक : सायली कदम), बालमैफल (संपादक : कुमार कदम), साहित्यरंजन (संपादक : सत्यवान तेंटाबे), माझी सहेली (संपादक : हेमा मालिनी), दर्यावर्दी (संपादक : अमोल सरतांडेल), चंद्रपूर झेप (संपादक : बबन बांगडे), धमाल धमाका (संपादक : नसीर शेख), मुक्ता (संपादक : शोभना देशमुख), दामिनी (संपादक : शीतल करदेकर), श्री अक्षरधन (संपादक : सरिता गुजराथी), श्री गजानन आशिष, भक्तीसंगम (संपादक : सुधाकर सामंत).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2015 3:22 am

Web Title: diwali magazine 7
Next Stories
1 प्रयोगशील शेतक-याला कृषिभूषण पुरस्कार देणार – उंडाळकर
2 उपजिल्हाप्रमुख ज्ञानदेव पवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
3 कोयनेतील कपातीमुळे नदीकाठची ऊसशेती धोक्यात
Just Now!
X