27 January 2021

News Flash

“उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा…”

शिवसेनेनं अमेरिकेतील हिंसाचारावरून मोदींवर साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

अमेरिकेच्या संसदेवर हल्ला करत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारावर जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेनंही अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारावर भाष्य केलं आहे. या हिंसेच्या निमित्ताने शिवसेनेनं ट्रम्प यांच्याबरोबरच मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. “अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!,” असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून अमेरिकेत उफाळून आलेल्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चिमटे काढले आहेत. “निवडणुकीचा निर्णय फिरविण्यात यावा यासाठी प्रे. ट्रम्प यांनी यंत्रणेवर दबाव आणला. भ्रष्टाचाराचे मोह निर्माण केले, पण यापैकी एकही यंत्रणा ट्रम्प यांना बधली नाही. ट्रम्प यांनीच नेमलेले हे सर्व लोक होते. पण त्या सगळ्यांनी अमेरिकेच्या संविधानाशीच आमची बांधीलकी असल्याचे स्पष्ट केले. हे सर्व प्रयोग कोसळले तेव्हा एखाद्या गुंडाप्रमाणे ट्रम्प यांनी लोकांना चिथावणी दिली. ट्रम्प यांचे ‘झुंड’ सरळ अमेरिकेच्या संसदेत घुसले. त्यांनी संसदेवर हल्ला केला. अमेरिकेच्या संसदेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जो हिंसाचार घडला त्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतीव दुःख व्यक्त केले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“आमच्या पंतप्रधानांची वेदना समजून घेतली पाहिजे; पण या भयंकर ट्रम्पच्या गळ्यात गळे घालून कालपर्यंत जगातले अनेक राज्यकर्ते फिरत होते. इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन हे तर प्रे. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे सांगत जगभर फिरत होते. ट्रम्प हा शांततेचा पुतळा आहे असे जॉन्सन साहेबांना का वाटावे? या शांततेच्या पुतळ्याने भाडोत्री गुंड लोकशाहीच्या मंदिरात घुसवून अतिरेकी कारवायाच केल्या. अमेरिकन संसदेतील गोळीबारात चार लोक मेले आहेत. अमेरिकेवर ‘9/11’चा हल्ला झाला. तो अतिरेकी व दहशतवाद्यांनी घडवला. त्या हल्ल्यातून अमेरिका उभी राहिली. त्या हल्लेखोर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारले व पाताळात गाडले. पण प्रे. ट्रम्प यांनीच लादेनचा वारसा चालवत अमेरिकेच्या संसदेवर हल्ला घडवून आणला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

“ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं केंद्राच्या परराष्ट्र धोरणावरही निशाणा साधला आहे.

“प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले?”

“ट्रम्प यांनी आता सत्तेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जगावर मोठे उपकारच केले म्हणायचे! हिंदुस्थानातील लोकशाहीकडून अमेरिका, ब्रिटनने धडे घ्यायला हवेत. निवडणुकीत पराभव होताच इंदिराजी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा प्रत्येक नेत्याने शांतपणे सत्तेचे हस्तांतरण केले आहे. उद्या मोदींचा पराभव लोकशाही मार्गाने झाला तर तेसुद्धा त्याच परंपरेचे पालन करतील. म्हणून प्रिय मित्र असूनही ट्रम्प यांच्या झुंडशाहीचा धिक्कार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. अमेरिका व हिंदुस्थानच्या लोकशाहीत साम्यस्थळे नाहीत. विसंगतीच जास्त आहे. आमच्याकडे निवडणुकांत पराभव होऊ नये यासाठीच हिंसाचार, धर्मद्वेषाचे राजकारण पेटवले जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हतबल केले की त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची वेळच येत नाही. प्रे. ट्रम्प हे आमच्या देशात येऊन काय शिकले? अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल,” असा निशाणा शिवसेनेनं मोदींवर साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 10:04 am

Web Title: donald trump stormed the capitol hill in washington dc shivsena narendra modi bmh 90
Next Stories
1 भंडारा : मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश; राहुल गांधींनी केलं मदतीचं आवाहन
2 महाराष्ट्राच्या काळजाचं पाणीपाणी! भंडाऱ्यातील अग्नितांडवात दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू
3 मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच
Just Now!
X